Ashok Kharat : भोंदू तांत्रिक म्हणून चर्चेत असलेल्या अशोक खरात प्रकरणात आता आणखी एक खळबळजनक माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अनेक वरिष्ठ सरकारी अधिकारी आपल्या पसंतीच्या ठिकाणी बदली मिळवण्यासाठी खरातच्या संपर्कात जात असल्याचा आरोप केला जात आहे.
या दाव्यानंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली असून, “अधिकाऱ्यांच्या बदल्या खरातच्या इशाऱ्यावर होत होत्या का?” असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. काही अधिकाऱ्यांनी चॉईस पोस्टिंगसाठी त्याच्या ‘दरबारात’ हजेरी लावल्याची चर्चा सध्या जोरात आहे.
यासोबतच आणखी एक धक्कादायक बाब समोर येत आहे. या कथित व्यवहारांमध्ये रोख रकमेऐवजी जमीन व्यवहारांच्या स्वरूपात ‘देणगी’ किंवा ‘दक्षिणा’ दिली जात असल्याचीही चर्चा रंगली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे स्वरूप अधिकच गंभीर बनले आहे.
दरम्यान, या सर्व घडामोडींमुळे प्रशासन आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली असून, खरातचे संबंध आणि त्याचे जाळे नेमके किती खोलवर पसरले आहे, याबाबत तपास यंत्रणा सखोल चौकशी करत आहेत. या तपासातून आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


