Maharashtra Weather : राज्यातील हवामानात सातत्याने बदल होत असून थंडीचा प्रभाव कमी होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांत ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस आणि तुरळक गारपीट पाहायला मिळाली. मंगळवारी राज्यातील काही भागांत पावसाने हजेरी लावली, तर गुरुवारी सकाळी काही ठिकाणी गारपीटही झाली. दरम्यान, आजपासून राज्यात किमान तापमानात २ ते ४ अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे थंडी कमी होऊन उकाडा वाढण्याचा अंदाज आहे.
या हवामान बदलांचा फटका शेतकरी आणि मच्छिमारांना बसत आहे. पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशामुळे मासे स्थलांतरित झाल्याने मासेमारीवर परिणाम झाला असून, समुद्रात वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे मच्छिमार अडचणीत आले आहेत. मंगळवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांनी भरपाईची मागणी केली आहे.
दरम्यान, बुलढाणा जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे कांदा बियाणे उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून ढगाळ हवामान कायम असल्याने कांदा पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढला असून, उत्पादनावर गंभीर परिणाम होत आहे. तापमानातील या लपंडावामुळे नागरिकांच्या आरोग्यावरही परिणाम होत असल्याचे चित्र आहे.


