मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेत झालेल्या अकाली निधनामुळे यंदाचा राज्याचा अर्थसंकल्प कोण सादर करणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच यंदा राज्याचा अर्थसंकल्प मांडण्याची दाट शक्यता आहे. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून सुरू होणार असून, ६ मार्च रोजी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे.
सध्या अर्थ खात्याची जबाबदारी कोणाकडे सोपवली जाणार याबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी विद्यमान परिस्थितीत मुख्यमंत्री फडणवीस स्वतः ही जबाबदारी पार पाडतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यापूर्वी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी अर्थसंकल्प सादर केला होता.
आगामी अर्थसंकल्पात विकासकामे, शेतकरी, सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रासाठी महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता असून, प्रशासकीय पातळीवर तयारीला वेग आला आहे. अजित पवारांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर शासन सक्षमपणे मात करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


