पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुणे जिल्ह्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार थांबवण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.
अजित पवार यांच्या निधनामुळे शोक व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणतेही प्रचार सभा, रोड शो किंवा जाहीर कार्यक्रम घेतले जाणार नाहीत. उमेदवारांनी केवळ घरोघरी जाऊन पत्रके वाटून प्रचार करावा, असे आदेश पक्षाने दिले आहेत. तसेच निवडणुकीनंतर विजयी उमेदवारांकडून कोणतीही मिरवणूक काढली जाणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, बुधवारी सकाळी बारामतीजवळ झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता. या घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. त्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या नेतृत्वाबाबतही चर्चा सुरू असून, पक्षाने पुढील निर्णयांसाठी हालचाली सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत.


