Maval Result: मावळ तालुक्याच्या राजकीय इतिहासात आज मोठी क्रांती पाहायला मिळाली. गेल्या २५ वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेली मावळ पंचायत समिती राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) अक्षरशः खेचून आणली आहे. या निवडणुकीत आमदार सुनील शेळके यांनी भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे यांच्या रणनीतीवर मात करत मावळ तालुका ‘भाजपमुक्त’ केला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व ५ आणि पंचायत समितीच्या सर्व १० जागा जिंकून राष्ट्रवादीने तालुक्यात ‘क्लीन स्वीप’ दिला आहे.
कार्यकर्त्यांचे अश्रू आणि ‘दादां’च्या आठवणीत जल्लोष
विजयाचे गुलाल उधळत असताना मावळमध्ये एक वेगळेच वातावरण पाहायला मिळाले. कार्यकर्त्यांनी हातात अजित पवार यांचे फोटो घेऊन “अजितदादा अमर रहे”च्या घोषणा दिल्या. “आज हा ऐतिहासिक विजय पाहायला दादा असायला हवे होते,” अशा भावना व्यक्त करत अनेक निष्ठावान कार्यकर्ते भर रस्त्यात ढसाढसा रडले. आनंदाच्या जल्लोषाला यावेळी अजितदादांच्या विरहाची झालर होती.
आमदार सुनील शेळके यांची ताकद सिद्ध
ही निवडणूक सुनील शेळके आणि बाळा भेगडे यांच्यातील प्रतिष्ठेची लढाई मानली जात होती. शेळके यांनी अत्यंत सूक्ष्म नियोजन करत भाजपचा २५ वर्षांचा अभेद्य किल्ला उद्ध्वस्त केला. विशेष म्हणजे, भाजपने या निवडणुकीत आपली सर्व शक्ती पणाला लावली होती, मात्र त्यांना एकाही जागेवर खाते उघडता आले नाही.
मावळ जिल्हा परिषद: विजयी शिलेदार
राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेच्या सर्व ५ जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे:
- टाकवे बु: अनंता पावसे (राष्ट्रवादी)
- इंदूरी: पल्लवी दाभाडे (राष्ट्रवादी)
- खरकाळे: दीपाली हुलावले (राष्ट्रवादी)
- कुसगाव बु: संतोष राऊत (राष्ट्रवादी)
- सोमटणे: मनीषा मुरे (राष्ट्रवादी)
पंचायत समितीतही १० जागांवर विजय
जिल्हा परिषदेसोबतच पंचायत समितीच्या १० ही जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले आहेत. यामुळे मावळच्या ग्रामीण सत्तेवर आता पूर्णपणे सुनील शेळके आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व निर्माण झाले आहे. हा निकाल आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने बाळा भेगडे आणि भाजपसाठी धोक्याची घंटा मानला जात आहे.


