NEET Paper Leak Update: देशभरातील लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागून असलेल्या NEET UG 2026 पेपरफुटी प्रकरणात एक खळबळजनक वळण मिळाले आहे. सुरुवातीला या गैरप्रकाराचा उगम राजस्थानमध्ये झाल्याचा संशय होता, मात्र तपास यंत्रणांच्या ताज्या निष्कर्षांनुसार, परीक्षेचा पेपर महाराष्ट्रातूनच लीक झाल्याचे प्राथमिक पुरावे मिळाले आहेत. या धक्कादायक खुलाशामुळे महाराष्ट्रातील शैक्षणिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून अनेक संशयित आता रडारवर आले आहेत.
तपासाची सूत्रे आता CBI कडे
प्रकरणाचे गांभीर्य आणि आंतरराज्य धागेदोरे पाहता, केंद्र सरकारने हा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (CBI) सोपवला आहे. सीबीआयने याप्रकरणी विशेष पथकाची (Special Team) स्थापना केली असून, हे पथक ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ (NTA) आणि ‘स्पेशल ऑपरेशन्स ग्रुप’ (SOG) कडून सर्व महत्त्वाची कागदपत्रे ताब्यात घेणार आहे. महाराष्ट्रातील कनेक्शन समोर आल्यामुळे आता तपासाचा मोर्चा राज्याकडे वळवण्यात आला आहे.
फेरपरीक्षेचा मार्ग मोकळा; ३ मेची परीक्षा रद्द
पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यामुळे ३ मे २०२६ रोजी झालेली परीक्षा अधिकृतपणे रद्द करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचा व्यवस्थेवरील विश्वास जपण्यासाठी NTA ने फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन परीक्षेच्या तारखा आणि हॉल तिकीट लवकरच अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केले जातील.


