अहिल्यानगर : शिर्डीजवळील सावळीविहीर येथील एका सीएनजी पंपावर वाहनात गॅस भरण्याच्या वादातून दाम्पत्याला मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नमिता घरद आणि त्यांच्या पतीला पंपावरील कर्मचारी आणि मालकाने मारहाण केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी आर जे पेट्रोलियमच्या मालकासह कर्मचाऱ्यांविरुद्ध भादंवि कलम 115, 352 आणि 351 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
साईदर्शनासाठी शिर्डीत आलेले नमिता घरद आणि त्यांचे पती मुंबईला परतण्यापूर्वी सावळीविहीर येथील सीएनजी पंपावर गॅस भरण्यासाठी गेले होते. शुक्रवारी पंपावर गॅस संपल्याचे सांगण्यात आल्याने ते परत गेले. शनिवारी पुन्हा पंपावर आल्यानंतर त्यांना तासन् तास रांगेत उभे राहावे लागले, परंतु गॅस मिळाला नाही. यावेळी पंपावरील कर्मचारी रांगेत नसलेल्या ओळखीच्या व्यक्तींना प्राधान्याने गॅस भरून देत असल्याचे दाम्पत्याच्या निदर्शनास आले.
नमिता घरद यांनी याबाबत कर्मचाऱ्यांना जाब विचारला आणि गॅस भरण्यासाठी विलंब का होत आहे, तसेच रांगेतून इतरांना प्राधान्य का दिले जात आहे, याची विचारणा केली. यावर कर्मचाऱ्यांनी तांत्रिक कारणे सांगितली, परंतु पंप मालकाचे नातेवाईक आल्यानंतर त्यांना तत्काळ गॅस भरून देण्यात आले. यावरून दाम्पत्याने आक्षेप घेतला. यामुळे कर्मचारी आणि दाम्पत्यामध्ये शाब्दिक वादावाद झाले. वादाचे रूपांतर शिवीगाळ आणि नंतर मारहाणीत झाले. पंप मालक आणि कर्मचाऱ्यांनी दाम्पत्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.
या घटनेनंतर नमिता घरद यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पंप मालक आणि कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. प्रकरणाची चौकशी सुरू असून, पोलिसांनी मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत दिले आहेत. ही घटना स्थानिकांमध्ये चर्चेचा विषय बनली असून, सीएनजी पंपांवरील गैरव्यवहार आणि कर्मचाऱ्यांच्या मुजोरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.


