Girish Mahajan : नाशिक येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित शासकीय कार्यक्रमात मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. कार्यक्रमादरम्यान उपस्थित असलेल्या एका महिला वन अधिकाऱ्याने थेट आक्षेप घेत, “संविधानाचे निर्माते असलेल्या बाबासाहेबांचे नाव का घेतले नाही?” असा सवाल केला. यामुळे काही काळ कार्यक्रमस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले.
या घटनेचे पडसाद राज्यभर उमटू लागले असून, मंत्री गिरीश महाजन यांच्याविरोधात पोलीस तक्रार दाखल करण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया देत, महाजन यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
अनवधानाने नाव राहिले असेल?
वादानंतर गिरीश महाजन यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमध्ये ते नेहमी सक्रिय सहभाग घेतात. “मी गावात आणि तालुक्यातील कार्यक्रमांना उपस्थित राहतो. मातंग, वाल्मिकी समाजाच्या कार्यक्रमांनाही जातो. जामनेरमध्ये बाबासाहेबांचा भव्य पुतळा उभारला आहे. हे सर्व करत असताना अनवधानाने नाव राहिले असेल, पण एवढा गहजब कशासाठी?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
गेल्या ४० वर्षांत अंगात निळा शर्ट घातला नाही असं कधी झालाय का?
महाजन यांनी यावेळी दिलगिरी व्यक्त करत सांगितले की, ते बाबासाहेबांचे विचार जपणारे आहेत. “समाजात तेढ निर्माण करू नका. ॲट्रॉसिटीची मागणी कशासाठी केली जातेय, हे मला कळत नाही. मी गावात पंगत देतो, सर्वांसोबत जेवतो. गेल्या चाळीस वर्षांत अंगात निळा शर्ट घातला नाही असे कधी झाले का?” असे म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
दरम्यान, या प्रकरणात वन विभागाच्या कर्मचारी माधवी जाधव आणि दर्शना सौपुरे यांनी मंत्री महाजन यांच्याविरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या समर्थनार्थ नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर जमून घोषणाबाजी केली. पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे.


