Ashok Kharat : अशोक खरात प्रकरणात तपासाचा वेग वाढला असून आता या प्रकरणाची व्याप्ती अधिक वाढण्याची शक्यता आहे. महिलांचे लैंगिक शोषण आणि बेकायदेशीर संपत्ती उभारल्याच्या आरोपांखाली अटकेत असलेल्या खरातच्या कृत्यांबाबत धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलिसांकडून सुरू असलेल्या सखोल चौकशीत त्याने उभारलेल्या संस्थेच्या ट्रस्टींचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
खरातने स्थापन केलेल्या संस्थानच्या आर्थिक व्यवहारांवरही तपास यंत्रणांचे लक्ष केंद्रित झाले आहे. कोट्यवधी रुपयांची संपत्ती त्याने कशी उभारली, याचा मागोवा घेतला जात आहे. या प्रकरणामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली असून कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, खरातला गुरु मानणाऱ्या रुपाली चाकणकर यांनी यापूर्वीच आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्या संबंधित संस्थेच्या ट्रस्टी असल्याने त्यांचीही चौकशी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विश्वस्त मंडळाची मुदत ऑगस्ट २०२५ मध्येच संपल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
खरात अटकेत गेल्यानंतर संस्थेच्या विश्वस्त मंडळाचा फलकही हटवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विशेष तपास पथक (SIT) लवकरच संबंधित ट्रस्टींना चौकशीसाठी समन्स बजावू शकते. मंदिर संस्थेच्या कामकाजासह आर्थिक व्यवहारांचीही चौकशीच्या कक्षेत समावेश करण्यात आला आहे.
तपासाच्या अनुषंगाने पोलिसांनी मंदिरातील पुजारी, वॉचमन आणि इतर कर्मचाऱ्यांची सखोल चौकशी केली. तब्बल आठ तास चाललेल्या या चौकशीत मंदिर व बंगल्यातील हालचालींबाबत महत्त्वाची माहिती गोळा करण्यात आली. नाशिक पोलिस आणि SIT संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करत आहेत.


