Malegaon Crime News: मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात रविवारी संध्याकाळी तीन वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. प्राथमिक तपासानुसार आरोपीचे नाव शेखर संजय खैरनार असे असून तो गावातील स्थानिक सुतार आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, चॉकलेटचे आमिष दाखवून त्याने मुलीला गावाबाहेरील मोबाईल टॉवरजवळ नेले आणि निर्जन ठिकाणी अत्याचार करून दगडाने ठेचून तिची हत्या केली. मुलीच्या शरीरावर गंभीर जखमा आढळून आल्या असून गळा दाबल्याचे संकेतही प्राथमिक तपासातून दिसून येत आहेत.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक प्रीतम कुमार चौधरी, सहाय्यक निरीक्षक प्रीती सावंजी आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली. मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला. दरम्यान, या भीषण घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड संताप उसळला.
हेही वाचा – Jalna Murder Case: घरातल्या घरातचं जुळलं सूत; पत्नीने दिरासोबत मिळून केली पतीची हत्या
गावकऱ्यांनी आरोपीला तातडीने कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवत खैरनारला ताब्यात घेतले असून त्याने आरोपाची कबुली दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, सोमवारी सकाळपर्यंत पीडितेच्या कुटुंबीयांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार देत गुन्हेगाराला फाशीच्या शिक्षेची मागणी केली. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


