पुणे : पुण्यात गेल्या आठवडाभरात पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांवर तीन हल्ल्याच्या घटना घडल्याने संतप्त झालेल्या पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने मोठा निर्णय घेतला आहे. पोलिसांकडून ठोस कारवाई आणि सुरक्षेची हमी मिळाली नाही, तर यापुढे संध्याकाळी ७ वाजेनंतर शहरातील सर्व पेट्रोल पंप बंद ठेवण्यात येणार आहेत.
असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी सांगितले, “कर्मचाऱ्यांच्या जीवाला सतत धोका निर्माण झाला आहे. याबाबत पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्त आणि ग्रामीण पोलिस अधीक्षकांना पत्र देऊनही अद्याप ठोस पावलं उचलली गेली नाहीत. त्यामुळे आम्हाला हा कठोर निर्णय घ्यावा लागत आहे. पोलिसांनी गुंडांवर आळा घातला नाही तर संध्याकाळी ७ नंतर एक थेंबही इंधन मिळणार नाही.”
पेट्रोल पंप हे अत्यावश्यक सेवा असल्याने पूर्णपणे बंद करणं शक्य नसल्याचंही असोसिएशनने मान्य केलं आहे. मात्र, कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय अटळ असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार हे सक्षम अधिकारी असून लवकरच यावर तोडगा निघेल, अशी आशा असोसिएशनने व्यक्त केली आहे. या निर्णयामुळे पुणेकरांना संध्याकाळी इंधन भरण्यासाठी मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे.


