Bacchu kadu : प्रहार जनशक्ती पक्षाच्या शेतकरी जनआक्रोश मोर्चाने नाशिक जिल्ह्यातील येवला येथे जोरदार धडक दिली. या आंदोलनादरम्यान आमदार बच्चू कडू यांचा संताप अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. देवरगाव परिसरातील वीज समस्येवरून त्यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.
प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीदरम्यान कांदा आणि मका दराच्या मुद्द्यावर चर्चा झाली. मात्र, शेतकऱ्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय न झाल्याने वातावरण अधिकच तापले. संतप्त झालेल्या बच्चू कडूंनी थेट कार्यालयावर कांदे फेकून आपला निषेध व्यक्त केला. त्यांच्या पाठोपाठ आंदोलक शेतकऱ्यांनीही कांदे फेकत आंदोलन तीव्र केले.
दरम्यान, आंदोलनाचा वेगळाच रंग येवल्यात पाहायला मिळाला. प्रांताधिकारी कार्यालयाच्या आवारातच शेतकऱ्यांनी पंगती मांडून सामूहिक जेवण केले. खिचडीवर ताव मारत शेतकऱ्यांनी आपली एकजूट दाखवली.
हजारोंच्या संख्येने शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. गळ्यात कांद्याच्या माळा घालून त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कांदा आणि मक्याला योग्य हमीभाव द्यावा, तसेच भावांतर योजना लागू करावी, अशी ठाम मागणी बच्चू कडूंनी केली. मागण्या मान्य न झाल्यास प्रांताधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.


