Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात अटकेत गेल्यानंतर त्याच्या कृत्यांचे धक्कादायक तपशील एकामागून एक समोर येत आहेत. महिलांचे लैंगिक शोषण आणि फसवणुकीच्या आरोपांमध्ये अडकलेल्या खरातविरोधात आता आणखी एक गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात त्याने एका विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याचा आरोप समोर आला आहे.
या नव्या तक्रारीनंतर खरातविरोधातील एकूण गुन्ह्यांची संख्या सहावर पोहोचली आहे. लग्न, धार्मिक विधी आणि तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलांची फसवणूक आणि अत्याचार केल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे दाखल होत आहेत. त्यामुळे पोलिसांनी तपास अधिक तीव्र केला आहे.
दरम्यान, खरातने स्थापन केलेल्या ट्रस्टमधील गैरप्रकारही उघडकीस येत आहेत. शिवनिका संस्थान स्थापनेवेळी शैक्षणिक आणि सामाजिक उपक्रम सुरू करण्याची मोठी आश्वासने देण्यात आली होती. मात्र गेल्या १५ वर्षांत हे उपक्रम सुरू न करता केवळ स्वतःची संपत्ती वाढवल्याचा आरोप होत आहे. साध्या जीवनातून सुरुवात केलेल्या खरातने आलिशान गाड्यांपर्यंत मजल मारल्याचा दावा स्थानिकांकडून केला जात आहे.
नाशिकमधील ‘श्री शिवनिका संस्थान’च्या आर्थिक व्यवहारांमध्येही संशयास्पद वाढ आढळून आली आहे. ऑडिट अहवालानुसार, २०२० ते २०२२ या काळात संस्थेचे उत्पन्न काही लाखांमध्ये होते आणि तोटाही नोंदवला गेला होता. मात्र २०२४ मध्ये अचानक देणग्यांचा मोठा ओघ सुरू झाला आणि संस्थेला तब्बल ७६ लाखांहून अधिक रक्कम प्राप्त झाली. खर्च वजा जाता ७० लाखांपेक्षा अधिक रक्कम शिल्लक राहिल्याचे समोर आले आहे.
तसेच संस्थेची मालमत्ता २०२२ मधील ९६ लाखांवरून २०२५ पर्यंत १.८१ कोटींवर पोहोचली आहे. बँकेतही मोठ्या प्रमाणात मुदत ठेवी असल्याचे उघड झाले आहे. या निधीचा स्रोत काय, देणग्या नेमक्या कुठून आल्या, याचा तपास आता केंद्रस्थानी आहे. अवघ्या काही वर्षांत खरातच्या संपत्तीत ७४ पट वाढ झाल्याचे समोर आल्याने या प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवली आहे.


