Nashik Crime: गंगापूर रोडवरील ध्रुवनगर परिसरात एक काळजाचा थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे. एका २१ वर्षीय तरुणीने राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्येपूर्वी तिने आपल्या तळहातावर आई-वडिलांसाठी लिहिलेला भावूक संदेश वाचून उपस्थितांचे डोळे पाणावले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
तळहातावरील तो संदेश ठरला शेवटचा!
दीक्षा दत्तू त्रिभूवन (वय 21) असे या दुर्दैवी तरुणीचे नाव आहे. रविवारी (18 जानेवारी) सायंकाळी 6 च्या सुमारास, घरात कोणीही नसताना दीक्षाने टोकाचे पाऊल उचलले. गळफास घेण्यापूर्वी तिने आपल्या हातावर ‘आय लव्ह यू मॉम-डॅड’ असा हृदयस्पर्शी मेसेज लिहिला होता. कुटुंबीयांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी तातडीने तिला रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
हेही वाचा – धक्कादायक! संविधान विटंबना प्रकरणातील आरोपी दत्ता पवारची आत्महत्या; जामिनावर सुटून घरी आल्यानंतर टोकाचं पाऊल
अभ्यासू आणि शांत स्वभावाची दीक्षा
गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीक्षा ही दिव्यांग होती. शारीरिक मर्यादा असूनही ती अभ्यासात अत्यंत हुशार आणि स्वभावाने अतिशय संयमी होती. तिच्या अशा अनपेक्षित जाण्याने त्रिभूवन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिच्या पश्चात आई, वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दीक्षाने इतके मोठे पाऊल का उचलले? तिच्यावर काही शैक्षणिक किंवा मानसिक दडपण होते का? याचा शोध पोलीस घेत आहेत. जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला. ध्रुवनगरमधील एका शांत आणि प्रेमळ मुलीने अशा प्रकारे जगाचा निरोप घेतल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


