अहिल्यानगर : कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे परिसरातील जुन्या खाणीतील खोल पाण्यात बुडून डाऊच खुर्द येथील सख्ख्या भाऊ-बहिणीचा करुणांतिक मृत्यू झाल्याने संपूर्ण गाव आणि तालुका शोकमग्न झाला आहे. मेंढीपालन व्यवसाय असलेल्या गणपत बडे यांचे १९ वर्षीय मुलगा सार्थक गणपत बडे आणि १८ वर्षीय मुलगी सुरेखा गणपत बडे अशी मृतांची नावे आहेत. शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नेमकं काय घडलं?
डाऊच खुर्द गावातील गणपत बडे यांचा मेंढीपालनाचा व्यवसाय आहे. शनिवारी दुपारी सार्थक आणि सुरेखा हे दोघे गावाजवळील चांदेकसारे भागात मेंढ्या चारत होते. अचानक एक मेंढी खाणीच्या कडेला पोहोचून खोल पाण्यात घसरली. मेंढीला वाचवण्यासाठी सुरेखाने पुढे होऊन उडी मारली, मात्र पाय घसरल्याने ती स्वतःच पाण्यात बुडू लागली. बहिणीला बुडताना पाहताच सार्थकने क्षणभराचा विलंब न करता तिला वाचवण्यासाठी खाणीत उडी घेतली. मात्र, पाण्याची मोठी खोली, दलदल आणि भीतीमुळे दोघेही बाहेर येऊ शकले नाहीत. खाणीत जमा झालेल्या गाळामुळे त्यांचा दुर्दैवी अंत झाला.
खाणीजवळ कपडे धुण्यासाठी थांबलेल्या काही महिलांनी हा प्रकार पाहिला आणि आरडाओरड करून परिसरातील नागरिकांना सतर्क केले. पोलीस पाटील मीराताई रोकडे, डॉ. गोरक्षनाथ रोकडे आणि उपसरपंच वसिम शेख यांनी त्वरित कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनचे पीआय संदीप कोळी यांना माहिती दिली. संजय गुरसळ यांनी तरुणांसह घटनास्थळी धाव घेतली. पोलिस कर्मचारी तात्काळ दाखल झाले आणि ग्रामस्थांच्या मदतीने प्रयत्न करून दोन्ही मृतदेह खाणीतून बाहेर काढले. रुग्णवाहिकेद्वारे मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेले गेले.
शवविच्छेदनानंतर दोन्ही मृतदेह डाऊच खुर्द गावात आणले गेले. शोकाकुल वातावरणात दोघांचाही अंत्यसंस्कार पार पडला. गावकऱ्यांनी आणि नातेवाईकांनी कुटुंबाला धीर देण्याचा प्रयत्न केला, मात्र सार्थक आणि सुरेखाच्या जाण्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. गणपत बडे यांच्या कुटुंबाने दोन मुले एकाच वेळी गमावल्याने त्यांच्यावर खूप मोठा आघात झाला आहे.


