Ajit Pawar Death : ‘राजकारणापेक्षा धंदा-पाणी करा आणि सुखात राहा…’, चाकणच्या सभेत अजित पवारांनी आपल्या खास शैलीत कार्यकर्त्यांना दिलेला हा कानमंत्र आज त्यांच्या आयुष्याचा अखेरचा संदेश ठरला आहे. बुधवारी सकाळी झालेल्या भीषण विमान अपघाताने महाराष्ट्राच्या राजकारणातील एका झंझावाताचा अंत केला. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच केवळ बारामतीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला असून कार्यकर्त्यांच्या आक्रोशाने आसमंत दुमदुमून गेला आहे.
काय होता तो ‘लाईफ मंत्र’?
नेहमी स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या अजित पवारांनी काही दिवसांपूर्वी कार्यकर्त्यांना राजकारणाच्या मोहापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. ते म्हणाले होते, “जमिनीचे पैसे आले की अनेकांना राजकारणाची हौस फुटते. स्वतः किंवा बायकोला निवडणुकीला उभं करण्याच्या नादात पडू नका. राजकारण खूप वाईट (वंगाळ) आहे. त्यापेक्षा मुलांच्या शिक्षणावर लक्ष द्या, निर्व्यसनी राहा आणि आनंदाने जगा. पैसे संपले की रिकाम्या हाताने बसण्याशिवाय काहीच उरणार नाही.” आज हाच व्यावहारिक सल्ला दादांची शेवटची आठवण म्हणून समर्थकांच्या मनात घर करून राहिला आहे.
युगेंद्र, रोहित अन् जय पवारांना अश्रू अनावर
अजितदादांचे पार्थिव ज्या रुग्णालयात नेण्यात आले, तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले होते. पार्थिव पाहताच सुपुत्र जय पवार, आमदार रोहित पवार आणि पुतणे युगेंद्र पवार यांना आपला शोक अनावर झाला. आपल्या लाडक्या नेत्याला अशा अवस्थेत पाहून कार्यकर्त्यांनी रुग्णालयाबाहेर एकच हंबरडा फोडला. “आमचा बाप माणूस गेला,” अशा शब्दांत समर्थक आपल्या भावना व्यक्त करत आहेत.
पवार कुटुंब बारामतीत एकवटले
या कठीण प्रसंगी संपूर्ण पवार कुटुंब एकमेकांच्या आधारासाठी बारामतीत दाखल झाले आहे. सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार तातडीने दिल्लीहून विमानाने बारामतीत पोहोचल्या. ज्येष्ठ नेते शरद पवार आणि प्रतिभा काकी यांनीही रुग्णालयात धाव घेऊन जय आणि सुनेत्रा वहिनींचे सांत्वन केले. संपूर्ण बारामती शहर आज दुःखात बुडाले असून बाजारपेठांनी कडकडीत बंद पाळून श्रद्धांजली वाहिली आहे.


