Pankaja Munde Dasara Melava: बीड जिल्ह्यातील सावरगाव घाट येथील भगवान गडावर झालेल्या पारंपरिक दसरा मेळाव्याला यंदाही मोठ्या संख्येने गर्दी झाली. या मेळाव्यात भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधत पाणी प्रश्नावर ठाम भूमिका मांडली. प्रीतम ताईंनी रेल्वे आणली, आता मी पाणी आणल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत त्यांनी बीड जिल्ह्यातील जनतेसाठी महत्त्वाची घोषणा केली.
मेळाव्याच्या सुरुवातीला पंकजा मुंडे यांनी भगवान बाबांच्या दर्शनाचा उल्लेख करत भावनिक भाष्य केले. लोक विचारत होते, यंदा दसरा मेळावा होणार का? पण मी तर भगवान बाबांच्या दर्शनालाच आले. माझे वडील दरवर्षी येथे मेळाव्यात सहभागी व्हायचे. एकदा मला गडाच्या पायथ्याशी मेळावा घ्यावा लागला होता, पण त्यानंतर मी पुन्हा गडावरच येत आहे, असेही त्यांनी सांगितले.
सावरगाव हे भगवान बाबांचे जन्मगाव असल्याचे स्मरण करून देताना पंकजा मुंडे म्हणाल्या, येथे उभी राहिलेली बाबांची मूर्ती माझ्या कार्यकर्त्यांच्या श्रमातून साकारली आहे. यामध्ये शासकीय निधीचा हातभार नाही, तर ऊसतोड कामगारांच्या घामाचे श्रम दडलेले आहेत. मुंडे साहेबांचा वारसा पुढे नेण्याचे माझे वचन आहे. मी माझ्या लोकांना मान खाली घालू देणार नाही. राजकारणाच्या पलीकडे जात सर्व समाजघटकांसाठी आपण लढत राहू, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
सत्तेत असो वा नसो, मी १८ पगड जातींसाठी आवाज उठवत राहणार आहे. काल मी धनगर समाजाच्या आरक्षण चळवळीत त्यांच्या सोबत होते. मराठा आरक्षणालाही आमचा विरोध नाही, पण आमच्या हक्कातून कोणीही ओढून घेऊ नये हीच अपेक्षा आहे, असेही त्यांनी स्पष्ट केलं. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा दाखला देत त्यांनी कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली. गांधी लवकर झोपत, बाबासाहेब मात्र जागे असायचे. कारण त्यांचा समाज झोपलेला होता. आज मलाही तसंच वाटतं. प्रीतमने रेल्वे आणली, पण पाणी मिळाल्याशिवाय मला झोप लागणार नाही, असं आश्वासन पंकजा मुंडे यांनी दिले.


