पिंपरी: पिंपरी-चिंचवड शारतीतून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका १८ वर्षीय तरुणीची दोन जणांनी निर्घृण हत्या केल्याची घटना घडली आहे.
ही घटना रविवारी रात्री साडे नऊच्या सुमारास घडली. कोमल भरत जाधव (वय-18) असे हत्या झालेल्या तरुणीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या वेळी कोमल ही रस्त्यावरून जात होती. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी कोमलवर धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात कोमल रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि तिचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान कोमल जाधवची हत्या नेमकी कोणी आणि का केली? याची माहिती अद्याप मिळू शकली नाही. परंतु, प्रेम प्रकरणातून ही हत्या झाली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस त्या अनुषंगाने देखील तपास करत आहेत. मात्र, भर रस्त्यात एका तरुणीची हत्या करण्यात आल्याने पिंपरी चिंचवडस शहरात एकच खळबळ उडाली आहे.
दुचाकीवरून येत आरोपींनी तरुणीचा भररस्त्यात खून केला. त्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले आहे. सदर आरोपी पळून जात असताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. दोघांनी डोक्याला हेल्मेट आणि अंगात काळे कपडे घातले असल्याने अद्यापही त्यांची ओळख पटू शकली नाही. पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे.


