Maharashtra Dam : राज्यातील जोरदार पावसाने धरणांमध्ये पाण्याचा साठा लक्षणीय वाढला असून, एकूण साठा ८५.७९ टक्के वर पोहोचला आहे. मोठ्या धरणांमध्ये ९३.१२ टक्के, मध्यम प्रकल्पांत ७७.८३ टक्के, तर लघु प्रकल्पांत ५७.१८ टक्के पाणीसाठा आहे. यंदाच्या पावसाळ्याने शेती, पाणीपुरवठा आणि वीजनिर्मितीसाठी सकारात्मक परिस्थिती निर्माण केली आहे.
विभागनिहाय जलसाठा
कोकण: ९२.५५% साठ्यासह आघाडी, धरणे ९७% भरली.
पुणे: ९१.४९% साठा, मोठ्या धरणांत ९७%.
नाशिक: ७९.३२%, मोठ्या धरणांत ९३%.
छत्रपती संभाजीनगर: ८१.१०%, मोठ्या धरणांत ९४%.
अमरावती: ८४.९७%, मोठ्या धरणांत ९१%.
नागपूर: ७७.९८%, मोठ्या धरणांत ७६.७५%.
राज्यातील २५९९ लघु प्रकल्पांमध्ये मात्र केवळ ५७.१८% (३९४८ दलघमी) साठा आहे. विशेषतः नाशिक आणि पुणेतील लघु प्रकल्प ५०% पेक्षा कमी भरले आहेत. जलसंपदा विभागाचे निवृत्त अभियंता हरिचंद्र चकोर यांनी सांगितले की, लघु प्रकल्पांची मर्यादित क्षमता आणि पर्जन्यछायेचे क्षेत्र यामुळे साठा कमी आहे. याचा परिणाम शेती आणि ग्रामीण पाणीपुरवठ्यावर होतो, तर मोठी धरणे मोठ्या नद्यांच्या पाणलोट क्षेत्रामुळे लवकर भरतात.
मोठ्या धरणांमुळे पाणीटंचाईची भीती कमी झाली असली, तरी लघु प्रकल्पांच्या अपुऱ्या साठ्यामुळे स्थानिक पातळीवर पाणीपुरवठ्याचे प्रश्न कायम आहेत. हवामान खात्याने पुढील काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवला असून, धरणांचा साठा आणखी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे कोकण, पुणे आणि नाशिकला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने धरणांच्या विसर्गाची तयारी सुरू केली असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.


