पाबळ : २१ हजार भाविक उज्जैन यात्रेला, बैलगाडा शर्यतीला १० हजार शौकीन, जाळीच्या देवाला अडीच हजार भावीक. सगळंच कसं भव्य आणि भव्य करणा-या पाबळ-केंदूर जिल्हा परिषद व पंचायत समिती गणात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वतीने गटाचे उमेदवार प्रफुल्ल शिवले, पाबळ गणाच्या वंदना प्रकाश पवार तर केंदूर गणाच्या सुचेता सनी थिटे यांनी मंगळवारी (ता.२०) आपले उमेदवारी अर्ज शिरुर येथे भरायला तब्बल १२०० चारचाकी वाहनांचा अक्षरश: ताफा दाखल झाला. वढु बुद्रुक येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या पवित्र समाधीस पुष्पहार घालून सर्व उमेदवारांनी गटातील सर्व १४ गावांमध्ये भव्य रॅली काढून प्रचाराची पहिली विजयी सलामी दिली. अर्थात विरोधी भाजपा गटातील निवडणूक सामसुम मात्र प्रामाणिक भाजपा कार्यकर्त्यांसाठी मात्र चिंतेचा विषय ठरत आहे.
’प्रफुलदादा शिवले नेता..’ गाण्याने घातला धुमाकुळ
सकाळी दहाच्या सुमारास वढु बुद्रुकपासून रॅली सुरू झाली ती ’प्रफुलदादा शिवले नेता..’ या अस्खलीत गावरान ढंगाच्या मराठी गाण्याने. या गाण्यात संपूर्ण प्रफुल्ल शिवले यांच्या पाबळ-केंदूर गटातील १४ गावांबद्दलचा आपला विकास आराखडाच मांडला आहे. रंगदार-ढंगदार आणि खुमासदार अशा या गाण्यामुळे संपूर्ण रॅलीतील सर्व पदाधिकारी-नेते-कार्यकर्ते अक्षरश: नाचून प्रचाराचा आनंद घेत शिरुरकडे जात होते.
असा झाला रॅलीचा प्रवास, घड्याळाचे झेंडे अन बॅनर…!
वढु बुद्रुक, आपटी, वाजेवाडी, पिंपळे-जगताप, जातेगाव खुर्द, चौफुला या मार्गाने या सर्व १२०० गाड्यांचा ताफा थेट करंदी येथे गेला. करंदीच्या पुढे केंदूर, पाबळ, धामारी, जातेगाव बुद्रुक, हिवरे, मुखई, खैरेवाडी-खैरेनगर मार्गे हा संपूर्ण ताफा थेट शिरुरच्या दिशेने गेला. भरगच्च संपूर्ण रोडवर चाललेली वाहने आणि गाड्यापुढे घड्याळाचे झेंडे अन बॅनर तसेच सोबत राष्ट्रवादीचा अन पक्षाचे नेते अजितदादा पवार, दिलीप वळसे पाटील अन आमदार माऊली कटके यांच्या नावाचा जयघोष यामुळे ही रॅली मोठी रंजक झाली. अर्थात सोबत चालू असलेले ’प्रफुलदादा शिवले नेता..’ हे गाणे मात्र चांगलेच रंगत भरत होते.
बाबोव्व…! शिवले-थिटे-पवारांचे अर्ज भरायला १२०० गाड्यांचा ताफा
एखाद्या विधानसभा उमेदवाराचा अर्ज भरायला जावे तसा कालच्या तिनही उमेदवारांचा अर्ज भरण्याचा कार्यक्रम झाला. पाबळ गणातील खैरेनगर, खैरेवाडी, जातेगाव बुद्रुक, मुखई, हिवरे, धामारी आणि केंदूर गणातील करंदी, वढु बुद्रुक, आपटी, वाजेवाडी, पिंपळे-जगताप या सर्व १४ गावांतून मोठ्या संख्येने पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते यांची मोठी रेलचेल या रॅलीत होती. पर्यायाने या रॅलीला पाहून कुणीही अगदी तोंडात बोट घालून म्हणत होता बाब्बोव्व….!


