Pune News : पुण्यातील प्रसिद्ध ‘रुबी हॉल क्लिनिक’मध्ये रुग्ण व्यवस्थापनाचा अत्यंत भोंगळ कारभार समोर आला आहे. एका ५५ वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्यांचा मृतदेहच अचानक गायब झाल्याचा धक्कादायक आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकारामुळे रुग्णालयात मोठा तणाव निर्माण झाला असून प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
नेमकी घटना काय?
सोलापूर जिल्ह्यातील अकलूज येथील रहिवासी सुनीता भगत (५५) यांना १८ जानेवारी रोजी उपचारासाठी रुबी हॉलमध्ये दाखल करण्यात आले होते. १९ जानेवारीच्या सकाळी डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. मात्र, त्यानंतर सुरू झालेला घटनाक्रम संशयास्पद होता. मृत्यूनंतर सर्व प्रक्रिया पूर्ण होऊनही रुग्णालय प्रशासन मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यास टाळाटाळ करत होते. बराच वेळ वाट पाहिल्यानंतर, सुनीता भगत यांचा मृतदेह अचानक एका बाहेरच्या रुग्णवाहिकेतून रुग्णालयाच्या परिसरात आणण्यात आला. रुग्णालयात मृत्यू झाला असताना मृतदेह बाहेर का नेण्यात आला? आणि तो दुसऱ्या गाडीतून का परत आला? याचे कोणतेही ठोस उत्तर प्रशासनाला देता आले नाही.
पोलीस कारवाई आणि तक्रार
या सर्व प्रकारामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात ठिय्या मांडला आणि संबंधित दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. हॉस्पिटल प्रशासनाने या प्रकरणी लेखी तक्रार प्राप्त झाल्याचे मान्य केले आहे. सहाय्यक पोलीस आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, या तक्रारीची दखल घेऊन कायदेशीर तपास सुरू करण्यात आला आहे.


