Tanishka Phalphale: भारतीय अंतराळ संशोधन क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत गलांडवाडी नं.1 (ता.इंदापूर) येथील कु.तनिष्का आत्माराम फलफले हिची प्रतिष्ठित भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) या देशाच्या प्रतिष्ठित संशोधन संस्थेत यु. आर. राव उपग्रह केंद्र बेंगलोर येथे प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झाली आहे. तनिष्का ही इंदापूर महाविद्यालयात भूगोल विभागात कार्यरत असणारे डॉ.आत्माराम फलफले यांची कन्या असून, इस्रोच्या नियोजित भारतीय अंतराळ संशोधन केंद्र निर्मितीच्या प्रकल्प कार्यात मार्गदर्शक म्हणून ए. शंकरा यांच्या मार्गदर्शनाखाली तनिष्का काम करणार आहे.
तनिष्का ही पुणे येथील एम.आय. टी., ए. टी. डी. विद्यापीठात एरोस्पेस अभियांत्रिकीच्या शेवटच्या सत्रात शिक्षण घेत आहे, 26 ते 30 ऑक्टोबर 2025 दरम्यान उत्तरप्रदेश मधील खुशीनगर येथे पार पडलेल्या ग्रँड फिनाले ऑफ इन स्पेस कन्सन्ट इंडिया स्पर्धेत तिने उल्लेखनीय काम केले आहे. तिने या अगोदर बेंगलोर येथील वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या राष्ट्रीय अंतराळ प्रयोगशाळेत परिषदेच्या मुख्य शास्त्रज्ञ अरिवोली दुराई यांच्या मार्गदर्शनाखाली एरोडायनामिक मॉडेलिंग मध्ये प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
हेही वाचा – सायकलपटू हरीश डोंबाळे याच्या यशामुळे इंदापूर तालुक्याचे नाव उज्ज्वल – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे
तनिष्काच्या या यशासाठी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी तनिष्का व तिच्या पालकांचे अभिनंदन केले. तसेच “कठोर परिश्रम, योग्य मार्गदर्शन आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवला तर कोणतेही स्वप्न साकार होऊ शकते,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ जीवन सरवदे तसेच उप प्राचार्य.दत्तात्रय गोळे, डॉ. शिवाजी वीर, डॉ. भरत भुजबळ डॉ. सदाशिव उंबरदंड यांनी अभिनंदन केले.
मान्यवरांकडून कौतुकाचा वर्षाव
या यशामुळे कुटुंबीय, शिक्षकवर्ग तसेच परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.अत्यंत मेहनत, सातत्य आणि विज्ञानावरील दृढ निष्ठा यांच्या जोरावर तनिष्काने ही संधी मिळवली आहे. शिक्षणकाळात तिने विज्ञान व संशोधन क्षेत्रात विशेष प्राविण्य मिळवले असून विविध शैक्षणिक उपक्रम, प्रकल्प व स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. तिच्या गुणवत्तेची दखल घेत इस्रोसारख्या नामांकित संस्थेत तिची निवड होणे ही अभिमानास्पद बाब आहे.तनिष्काच्या यशामागे तिचे पालक, मार्गदर्शक प्राध्यापक व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे. तनिष्काच्या या निवडीमुळे परिसरातील विद्यार्थ्यांना विज्ञान व अंतराळ संशोधनाकडे वळण्यासाठी नवी प्रेरणा मिळाली असून तिच्या पुढील वाटचालीसाठी सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.


