पुणे : पुणे शहराला ‘विद्येचे माहेरघर’ म्हणून ओळखले जाते, मात्र अलीकडच्या काळात कॉलेज परिसरातील गुंडगिरी आणि हिंसक घटनांमुळे हा लौकिक धोक्यात आला आहे. वाघोली येथील भारतीय जैन संघटना (BJS) कॉलेजच्या बाहेर चार जणांनी एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना घडली आहे. ही घटना रॅगिंग किंवा जुन्या वैमनस्यातून घडली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. या मारहाणीचा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर परिसरात खळबळ उडाली असून, विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
स्थानिक नागरिक आणि पालकांच्या मते, BJS कॉलेज परिसरात यापूर्वीही अशा प्रकारच्या हाणामाऱ्या आणि गुंडगिरीच्या घटना घडल्या आहेत. अनेक वेळा वाघोली पोलीस ठाण्यात याबाबत तक्रारी दाखल करण्यात आल्या, तरी ठोस कारवाईचा अभाव असल्याने असामाजिक घटकांचे धाडस वाढले आहे, असा आरोप होत आहे. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे सामान्य विद्यार्थ्यांना अशा अमानुष मारहाणीला सामोरे जावे लागत असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे.
या घटनेनंतर कॉलेज परिसरात नियमित पोलीस गस्त आणि कायमस्वरूपी बंदोबस्त तैनात करण्याची मागणी जोर धरत आहे. नागरिक, पालक आणि विद्यार्थ्यांच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पुणे शहर सरचिटणीस प्रशांत जमदाडे यांनी पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन सादर करून तात्काळ कठोर कारवाईची विनंती केली आहे.
वाढत्या गुंडगिरीमुळे वाघोली परिसरातील नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. पोलीस प्रशासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते आणि आरोपींवर कधी कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही घटना पुण्यातील शिक्षण संस्थांभोवतालच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा प्रकाश टाकणारी ठरली आहे.


