Prashant Jagtap Pune: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार असल्याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरू होती. पुण्यात नगरपरिषदांच्या निवडणूकीत अजित पवार गटाला मोठे यश मिळाले. शरद पवार गटाला मोठ्या पराभवाचा सामना पहावा लागला. त्यावर आता शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मोठ वक्तव्य केलं होतं. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास मी राजीनामा देईन, असा निर्वाणीचा इशारा शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिला होता. त्यावर आता त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला. पुण्यात भाजपला (BJP) शह देण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवार आणि काँग्रेस यांच्यासोबत एकत्र मोट बांधण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. मात्र, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रसेच्या या एकत्रीकरणाला प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी सुरुवातीपासूनच कडाडून विरोध केला आहे.
दोन्ही राष्ट्रवादी (NCP) आज एकत्र येण्याची घोषणा झाली तर माझा राजीनामा तयार आहे, असे प्रशांत जगताप यांनी म्हटले होते. त्यामुळे आता यावर शरद पवार गटाकडून (Sharad Pawar Camp) कशाप्रकारे तोडगा काढला जाणार, हे बघावे लागेल. तसेच प्रशांत जगताप यांनी राजीनामा दिल्यानंतर ते कोणता राजकीय पर्याय आजमवणार याबद्दलही अनेकांना उत्सुकता आहे. ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकलं झाली त्यानंतर मी पुण्यात शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा नव्याने बांधली. आगामी महानगरपालिका निवडणुकीत पुण्यात महाविकास आघाडी एकत्र लढली तर शरद पवार गटाला फायदा होईल. याउलट आपण अजित पवारांसोबत लढल्यास आपल्या पक्षाला तोटा होईल. तसेच निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा अजित पवार यांच्याशी युती करुन कार्यकर्त्यांचे मरण होत असेल तर मी पक्षातून बाहेर पडतो. मी अजून राजीनामा दिलेला नाही. पण दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर मी फक्त शहर अध्यक्षपदाचा नव्हे तर शरद पवार गटाच्या सदस्यत्त्वाचाही राजीनामा देईन, असे प्रशांत जगताप यांनी सांगितले होते. आता त्यांनी राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता पुढील काही तासांमध्ये यावर तोडगा निघणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.


