पिंपरी-चिंचवड: राज्यातील महापालिका निवडणुकांच्या रणधुमाळीमध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे माजी नगरसेवक आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रभावशाली नेते राहुल कलाटे यांनी आपल्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत (भाजप) प्रवेश करणार आहेत. हा प्रवेश ऐन निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे. यामुळे पिंपरी-चिंचवडमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, आमदार शंकर जगताप आणि बापू काटे यांच्या उपस्थितीत राहुल कलाटे यांचा भाजप प्रवेश पार पडणार आहे. कलाटे यांनी चिंचवड विधानसभा मतदारसंघातून तीन वेळा निवडणूक लढवली असून, विजयी उमेदवारांना तगडे आव्हान दिले आहे. मागील विधानसभा निवडणुकीत ते तुतारी चिन्हावर (शरद पवार गट) लढले होते. चिंचवड आणि पिंपरी-चिंचवड शहरात त्यांचे मोठे संघटनात्मक जाळे असून, अनेक समर्थक माजी नगरसेवक आणि कार्यकर्ते यापूर्वीच भाजपमध्ये दाखल झाले आहेत.
कलाटे यांच्या प्रवेशामुळे भाजपची पिंपरी-चिंचवडमधील ताकद आणखी वाढली आहे. महायुतीच्या तयारीला याचा मोठा फायदा होईल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. दुसरीकडे, शरद पवार गट आणि महाविकास आघाडीची मतपेढी कमकुवत होण्याची शक्यता आहे. कलाटे यांच्या प्रवेशाला स्थानिक पातळीवर काही विरोध झाला होता, मात्र भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने हा प्रवेश मंजूर केला.
या घडामोडींमुळे पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपची आघाडी मजबूत झाली असून, महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी मुख्य लढत रंगारंग होण्याची चिन्हे आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतरांच्या फेऱ्या सुरू असून, येत्या काही दिवसांत आणखी काही खळबळजनक घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.


