NCP Merger : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर पुन्हा चर्चा रंगली आहे. आमदार सुनील शेळके यांनी मोठं विधान करत, दोन्ही राष्ट्रवादी गट एकत्र येण्याची शक्यता अद्याप कायम असल्याचे संकेत दिले आहेत.
ते म्हणाले की, अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही गटांमध्ये चर्चाही झाल्या होत्या. मात्र त्या औपचारिक पातळीवर झाल्या नव्हत्या. तरीही, पक्ष एकत्र येऊन सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पुढे गेला, तर त्याचा आम्हाला अभिमान वाटेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
शेळके यांनी सुनेत्रा पवार यांना अजित पवार यांचे उत्तराधिकारी मानत त्यांना राष्ट्रीय अध्यक्षपद आणि नेतृत्व मिळणे योग्य असल्याचे सांगितले. “पक्षाच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येऊन सकारात्मक भूमिका घ्यावी,” असे आवाहनही त्यांनी केले.
दरम्यान, शरद पवार यांच्या गटातील काही नेत्यांनी विलीनीकरणाबाबत सकारात्मक संकेत दिल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच सुनेत्रा पवार यांचे नेतृत्व ज्यांना मान्य नसेल, ते इतर पर्याय निवडू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी अधोरेखित करत, त्यांच्या अपघाताचे सत्य लवकरच समोर येईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांच्यावर व्यक्त केला.
एकूणच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, पुढील काही दिवसांत मोठा राजकीय निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


