Sangli News : सांगली कारागृहात दोन टोळ्यांमध्ये झालेल्या भीषण मारहाणीने एकच खळबळ उडाली आहे. सराईत गुन्हेगार पवन साळुंखे आणि मेघशाम उर्फ मोठ्या जाधव यांच्यावर १६ जणांच्या टोळीने जीवघेणा हल्ला केला. लाथाबुक्क्यांसह विटांनी डोक्यात मारहाण केल्याने दोघे गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पवन साळुंखे याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करून त्याला स्थानबद्ध करण्यात आले होते, तर त्याचा साथीदार मेघशाम जाधव हाही गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे. दोघांना वेगवेगळ्या बरॅकमध्ये ठेवण्यात आले होते.
दरम्यान, त्यांचे कट्टर विरोधक आदित्य पवार याच्यासह १६ जणही कारागृहात वेगवेगळ्या गुन्ह्यांत बंदिस्त आहेत. कारागृहातील खुल्या मैदानात सर्व कैदी एकत्र आल्यावर दोन्ही टोळ्या आमनेसामने आल्या. यावेळी झालेल्या वादातून परिस्थिती चिघळली.
आदित्य पवार याने आपल्या साथीदारांना हल्ल्याचे आदेश दिल्यानंतर १६ जणांनी साळुंखे आणि जाधव यांचा पाठलाग करून बेदम मारहाण केली. या घटनेमुळे कारागृह प्रशासनावर कैद्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सध्या सांगली शहर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


