बारामती : बारामतीत आज राज्याच्या राजकारणात महत्त्वाची घडामोड घडली आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीचे निकाल जाहीर होताच उपमुख्यमंत्री अजित पवार हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या भेटीसाठी बारामतीतील ‘गोविंदबाग’ या निवासस्थानी दाखल झाले.
या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे हे आधीपासूनच गोविंदबागेत उपस्थित असल्याने या घडामोडीला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
पुणे महानगरपालिकेत भाजपने एकहाती वर्चस्व राखत तब्बल 120 जागांवर विजय मिळवला आहे. या निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटांनी एकत्र येत निवडणूक लढवली होती. मात्र, निकाल अपेक्षेप्रमाणे न लागल्याने हा मोठा धक्का मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि अजित पवार यांची ही पहिलीच थेट भेट असल्याने तिच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
ही भेट केवळ कौटुंबिक नसून, यामागे भविष्यातील राजकीय रणनीतीचा विचार असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अजित पवार गोविंदबागेत पोहोचताच बारामतीसह पुणे परिसरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली असून, पक्षाच्या भवितव्याबाबत उत्सुकता वाढली आहे.
या भेटीत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी पुढील निवडणुकांसाठी एकत्र येण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या काळात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होणार असून, भाजपला टक्कर देण्यासाठी आणि राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी दोन्ही गटांना एकत्र येणे गरजेचे असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.


