Pune Congress : पुणे विधानपरिषद निवडणुकीनंतर काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक अरविंद शिंदे यांनी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात थेट पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांना ई-मेल पाठवून नाराजी व्यक्त केली आहे.
विधानपरिषद निवडणुकीत शरद पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून हा वाद निर्माण झाला आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी पुण्यातील स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांशी कोणतीही चर्चा न करता हा निर्णय घेतल्याचा आरोप अरविंद शिंदे यांनी केला आहे. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचेही त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
महाविकास आघाडीत काँग्रेसला दुय्यम वागणूक मिळत असून पक्षाची गळचेपी होत असल्याचा गंभीर आरोपही शिंदे यांनी केला आहे. मित्रपक्षांशी समन्वय साधताना काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाला विश्वासात घेतले जात नसल्याने पक्षाचे नुकसान होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर अधिक भूमिका स्पष्ट करण्यासाठी अरविंद शिंदे आज पत्रकार परिषद घेणार आहेत. या परिषदेत ते प्रदेशाध्यक्षांवरील आरोपांबाबत आणि महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या भूमिकेबाबत सविस्तर भाष्य करण्याची शक्यता आहे. या घडामोडींमुळे पुणे काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.


