Pune NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसमधील पुणे शहरातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा समोर आला असून हे प्रकरण थेट पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्यापर्यंत पोहोचले आहे. वाढत्या नाराजीमुळे अखेर खासदार पार्थ पवार यांना हस्तक्षेप करावा लागल्याची माहिती समोर आली आहे.
विधान परिषद निवडणूक आणि पुणे महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदांच्या नियुक्त्यांमध्ये डावलण्यात आल्याची भावना निर्माण झाल्यानंतर पश्चिम भागाचे शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक सुभाष जगताप यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर सामाजिक न्याय विभागाच्या पश्चिम भागासाठी स्वतंत्र शहराध्यक्ष नियुक्त करण्याच्या निर्णयामुळे पक्षात नव्या वादाला तोंड फुटले.
सामाजिक न्याय विभागाचे विद्यमान शहराध्यक्ष जयदेव इसवे हे गेली २७ वर्षे पक्षात सक्रिय आहेत. मात्र, सुभाष जगताप यांनी पश्चिम भागासाठी किशोर कावरे यांची नियुक्ती केल्याने इसवे यांनी नाराजी व्यक्त करत थेट सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा सादर केला.
हे प्रकरण खासदार पार्थ पवार यांच्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांनी तातडीने हस्तक्षेप करत नियुक्ती प्रक्रियेची माहिती घेतली. त्यानंतर नव्या नियुक्तीला स्थगिती देण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे सध्या हा वाद तात्पुरता शमला असला तरी पक्षातील मतभेद पुन्हा एकदा उघड झाले आहेत.
दरम्यान, प्रदेश पातळीवरील मान्यता न घेता नियुक्ती करण्यात आल्याचा आरोप जयदेव इसवे यांनी केला आहे. यापूर्वीही कार्याध्यक्ष रामदास गाडे पाटील यांनी सुभाष जगताप यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सुनेत्रा पवार यांच्याकडे तक्रार केली होती.
पक्षातील वाढती नाराजी आणि स्थानिक नेत्यांमधील संघर्ष लक्षात घेता खासदार पार्थ पवार यांनी पुण्यातील संघटनात्मक घडामोडींवर अधिक लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


