Pune Crime: कौटुंबिक वादाचे भीषण रूप समोर आणणारी आणि मानवतेलाही हादरवून सोडणारी घटना मंचरमध्ये घडली आहे. एका आईने आपल्या तेरा वर्षीय मुलीचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केल्यानंतर सहा वर्षांच्या मुलाला सोबत घेत विहिरीत उडी मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारात सहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला असून संबंधित महिला बचावली आहे. मुलगी गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलाचे नाव निहांत आशिष बाणखेले (वय ६) असे आहे, तर जखमी मुलगी परिज्ञा आशिष बाणखेले (वय १३) हिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी हर्षदा आशिष बाणखेले (वय ३५) हिच्याविरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सतत वाद सुरू होते. यामुळे दोघे वेगळे राहत होते. पती आपल्या आई-वडिलांसोबत राहत होता, तर हर्षदा बाणखेले ही लालबाग प्रेस्टिज परिसरात दोन मुलांसह राहत होती.
दरम्यान, शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हर्षदाने घरातच मुलगी परिज्ञाचा वायरच्या साहाय्याने गळा आवळण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने मुलीला मारहाणही केली. गळा आवळल्यामुळे मुलगी बेशुद्ध पडल्याने ती मृत झाली, असा समज करून हर्षदाने घराला बाहेरून कुलूप लावले. यानंतर तिने सहा वर्षीय मुलगा निहांत याला सोबत घेऊन तपनेश्वर मंदिराजवळील विहिरीत उडी मारली. या घटनेत निहांतचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. मात्र, विहिरीत असलेल्या पाईपचा आधार मिळाल्याने हर्षदा बचावली.
अशी उघडकीस आली घटना
तपनेश्वर स्मशानभूमीत सकाळी एक विधी सुरू असताना, विहिरीजवळ गेलेल्या एका व्यक्तीला महिलेचा आर्त आवाज ऐकू आला. त्याने तत्काळ आरडाओरडा केल्याने स्थानिक नागरिकांनी धाव घेतली आणि दोघांना विहिरीतून बाहेर काढले. त्यांना तातडीने मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी निहांतला मृत घोषित केले. दरम्यान, घराचे कुलूप उघडल्यावर मुलगी परिज्ञा जखमी अवस्थेत आढळून आली. तिच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत. या प्रकरणी महिलेचा पती आशिष लक्ष्मण बाणखेले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी हर्षदा बाणखेले हिच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यादव करत आहेत.


