Voter List Scam: पुणे शहरात मतदार यादीच्या घोळाचा एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर प्रकार समोर आला आहे. पुण्याचे माजी महापौर आणि नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड झालेले दत्तात्रय धनकवडे यांच्यासह त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे नाव मतदार यादीतून गायब झाले आहे. सध्या सुरू असलेल्या मतदार यादी विशेष पुनरावलोकन मोहिमेदरम्यान (SIR) हा प्रकार उघडकीस आला असून, यावरून धनकवडे यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक आणि महसूल प्रशासनावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.
२५ वर्षांहून अधिक काळ मतदान; तरीही नाव गायब झाल्याने आश्चर्य
आपला प्रदीर्घ राजकीय प्रवास मांडताना धनकवडे म्हणाले की, त्यांनी १९९७ मध्ये हवेली पंचायत समितीची पहिली निवडणूक लढवली होती. त्यानंतर २००२ ते २०२४ या तब्बल २२ वर्षांच्या काळात झालेल्या सर्व महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी नियमितपणे मतदानाचा हक्क बजावला आहे. असे असतानाही केवळ तांत्रिक कारणे पुढे करून मतदार यादीतून नाव वगळले जाणे हा अत्यंत संशयास्पद आणि गंभीर प्रकार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
२००२ पूर्वीच्या रेकॉर्डचा घोळ
या तांत्रिक घोळाविषयी माहिती देताना धनकवडे यांनी सांगितले की, २००२ पूर्वी धनकवडी हा परिसर पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात येत होता आणि तिथे त्यांचे नाव नोंदवलेले होते. मात्र, सध्या सुरू असलेल्या विशेष पडताळणी मोहिमेत २००२ पूर्वीच्या यादीत तुमचे नावच दिसत नाही, असे मोघम उत्तर स्थानिक बीएलओकडून (BLO) त्यांना देण्यात आले. या संदर्भात गावातील सर्कल, तलाठी आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे धाव घेतली असता, त्यांच्याकडून कोणतीही ठोस माहिती न देता केवळ उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार; दोषींवर कारवाईची मागणी
गावच्या तलाठ्यापासून ते थेट वरिष्ठ पातळीपर्यंत पाठपुरावा करूनही केवळ दखल न घेतल्याने धनकवडे यांनी आता थेट पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची लेखी तक्रार दाखल केली आहे. एखाद्या माजी महापौराच्या नावाबाबत जर प्रशासन इतके निष्काळजी असू शकते, तर सर्वसामान्य नागरिकांचे काय, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
स्वीकृत नगरसेवकपद आणि धनकवडे यांचे स्थान
दत्तात्रय धनकवडे यांची नुकतीच पुणे महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. स्वीकृत नगरसेवक हे थेट जनतेतून निवडून येत नसले, तरी त्यांना महापालिकेच्या कामकाजात निर्वाचित लोकप्रतिनिधींइतकेच कायदेशीर अधिकार असतात. राजकीय क्षेत्रातील अनुभवी व्यक्तींना महापालिका प्रशासनात सामावून घेण्यासाठी ही तरतूद केली जाते, ज्यामुळे धनकवडे यांचे पुण्यातील राजकीय वजन स्पष्ट होते.


