BJP Pune Candidate List : पुणे महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. महापालिकेवर पुन्हा एकदा कमळ फुलवण्यासाठी भाजपने कंबर कसली असून, १६५ पैकी १०० उमेदवारांची पहिली यादी अंतिम केल्याची माहिती समोर आली आहे. उद्या, २६ डिसेंबर रोजी ही यादी अधिकृतपणे जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र, दुसरीकडे शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील जागावाटपाचा पेच अद्याप सुटलेला नाही.
भाजपच्या कोअर कमिटीची खलबते
पुण्यातील एका हॉटेलमध्ये पार पडलेल्या भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत उमेदवारांच्या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. या बैठकीला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि शहराध्यक्ष धीरज घाटे यांसारखे दिग्गज उपस्थित होते. या यादीत अनेक बड्या नेत्यांच्या नातेवाईकांनी उमेदवारीसाठी फिल्डिंग लावली आहे. १०० नावांवर एकमत झाले असले तरी, उर्वरित ४० ते ५० जागांवरील निर्णय आता प्रदेश पातळीवर देवेंद्र फडणवीस घेणार आहेत.
जागावाटपावरून युतीत ठिणगी?
शिवसेनेच्या (शिंदे गट) स्थानिक नेत्यांनी पुण्यात ३४ जागांची मागणी केली आहे. मात्र, भाजपने एवढ्या जागा देण्यास स्पष्ट नकार दिला आहे. भाजपने १२५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले असून, शिवसेनेला अपेक्षित जागा मिळत नसल्याने युतीमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत. उद्या ही अंतिम यादी मुख्यमंत्र्यांकडे सोपवली जाईल, मात्र त्याआधी मित्रपक्षाची समजूत काढण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर असेल.


