पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने (Pune BJP) आजपासून उमेदवारीसाठीचा सर्वात मोठा मॅरेथॉन सुरू केला आहे. शहरातील १६५ पैकी बहुतांश जागांवर भाजप लढणार असून, तब्बल २५०० इच्छुक उमेदवारांनी अर्ज घेतले आहेत. आज आणि उद्या (शनिवार-रविवार) दोन दिवस पुणे भाजप कार्यालयात सलग मुलाखती घेतल्या जाणार आहेत.
भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, गणेश बीडकर आणि माजी स्थायी समिती अध्यक्ष श्रीनाथ भिमाले हे तिघे मुलाखत पॅनलवर आहेत. पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघांनुसार जबाबदाऱ्या वाटून देण्यात आल्या असून, प्रत्येक प्रभागातील उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत घेऊन अंतिम नावे ठरवली जाणार आहेत.
“उमेदवाराची प्रभागातील माहिती, सामाजिक वर्चस्व, पूर्वीची कामगिरी आणि जिंकण्याची क्षमता यावरच निर्णय घेतला जाईल,” अशी माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी दिली. गेल्या तीन दिवसांत प्रत्येक प्रभागासाठी मॅरेथॉन बैठका घेऊन २०१७ च्या निवडणुकीतील निकाल, मतदारांचा कल आणि सामाजिक समीकरणांचा सखोल अभ्यास करण्यात आला आहे.
२०१७ मध्ये भाजपकडे ९८ नगरसेवक होते. त्यानंतर शिवसेनेतील ५ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यंदा भाजपने १२५ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले असून, २०१७ मध्ये अल्प मतांनी पराभूत झालेल्या उमेदवारांना पुन्हा संधी देण्यावर भर दिला जाणार आहे.
सोमवारी ३००० कोटींच्या कामांचा शुभारंभ
दरम्यान, निवडणुकीच्या तोंडावर भाजपने विकासाची मोठी झेप घेतली आहे. येत्या सोमवारी (ता. १५) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात हजेरी लावून एकाच ठिकाणी सुमारे ३,००० कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण करणार आहेत. यात स्थायी समितीने मंजूर केलेल्या ३९० कोटींच्या कामांचाही समावेश आहे. आचारसंहिता लागण्यापूर्वीच ही कामे सुरू करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.


