पुणे : पुण्यातून एक संतापजनक बातमी उघडकीस आली आहे. तळेगाव दाभाडे येथील स्टेशन तलावात पोलिसांना मृतदेह आढळून आला आहे. साक्षी कांतीकुमार भावर (वय-२२, रा. भीमाशंकर कॉलनी, वराळे मावळ, मूळ गाव बऊर) असे मृत तरुणीचे नाव आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्षी काही दिवसांपासून बेपत्ता होती. मृत तरुणी ही संध्याकाळ पासून मिसिंग होती. तिच्या कुटुंबीयांनी तसेच नातेवाईकांनी बरेच फोन लावले. मात्र, मोबाईल साईलेंट मोड वर असल्याने फक्त रींग येत होती आवाज येत नव्हता. त्यामुळे कोणालाच काही समजले नाही.
दरम्यान, या घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्था आणि आपत्ती व्यवस्थापन टीमच्या सदस्यांनी मिळून शोधमोहीम राबवली. निलेश संपतराव गराडे, शुभम काकडे, गणेश गायकवाड, राजेंद्र बंडगे, राजु सय्यद आणि अनिश गराडे यांच्या अथक प्रयत्नांमुळे साक्षीचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला आहे.
मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, या प्रकरणी प्राथमिक तपास सुरू आहे. ही आत्महत्या आहे की, यामागे काही वेगळं कारण आहे. साक्षीच्या मृत्यूचं नेमकं कारण काय हे अद्याप अस्पष्ट आहे. पुढील तपास तळेगाव दाभाडे पोलीस करत आहेत.


