शिक्रापूर: रांजणगाव, सणसवाडी परिसरातील कंपन्यांमध्ये कामगारांना मिळणाऱ्या किमान वेतनाबाबत राज्य शासनाच्या किमान वेतन सल्लागार मंडळाने नुकताच पाहणी दौरा केला. या मोहिमेत काही कंपन्या कामगार कायद्याचे, कामगारांच्या किमान वेतनाबाबतचे सर्रास उल्लंघन करत असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती शिष्ठमंडळ सल्लागार मंडळ सदस्य बाबासाहेब दरेकर यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य किमान वेतन सल्लागार मंडळाचे अध्यक्ष गणेश ताठे व कामगार आयुक्त डी. डी. पवार यांच्या नेतृत्वाखाली हे पथक औद्योगिक पट्ट्यात दाखल झाले होते. यावेळी चाकण येथील पाहणी करुन त्यांनी रांजणगाव आणि सणसवाडी येथील विविध लहान-मोठ्या कंपन्यांना भेटी दिल्या. यात कंपन्यांमध्ये किमान वेतन श्रेणी आणि कामगारांच्या सुविधांची प्रत्यक्ष चौकशी व पाहणी या पथकाने केली. या शिष्टमंडळात ताठे यांचेसमवेत सल्लागार मंडळाचे सदस्य बाबासाहेब दरेकर, बाळासाहेब भुजबळ, व कामगार विभागाचे वरिष्ठ अधिकारी, रांजणगाव विभागाचे सहाय्यक कामगार आयुक्त डी. डी. पवार, चाकणचे सहाय्यक आयुक्त कैलास मुजमुले, पी.बी.जाधव, एस.बी.माळी, एस.एस.पाटील, एस.एच.चोभे आणि सरकारी कामगार अधिकारी डी.जी.गोटके यांचा समावेश होता. आम्ही प्रत्यक्ष कंपन्यांमध्ये जाऊन चौकशी केली आहे. काही ठिकाणी कामगार कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आले असून, अशा सर्व कंपन्यांचा अहवाल शासनाला आम्ही सादर करीत आहोत. शासन योग्य ती कारवाई करेल.


