पुणे: पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सिंहगड किल्ल्यावर (Sinhagad Fort) एक धक्कादायक घटना घडली आहे. हैदराबाद येथून मित्रांसह पुण्यात फिरण्यासाठी आलेला 24 वर्षीय गौतम गायकवाड हा तरुण तानाजी कडा येथील खोल दरीत पाय घसरून कोसळल्याने बेपत्ता झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, आपत्ती व्यवस्थापन पथक, ग्रामीण पोलीस आणि स्थानिक गिर्यारोहक यांच्याकडून गौतमचा शोध घेण्यासाठी तीव्र शोधमोहीम राबवली जात आहे.
नेमकं काय घडलं?
हैदराबाद येथील गौतम गायकवाड हा पाच मित्रांसह बुधवारी (20 ऑगस्ट) पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर पर्यटनासाठी आला होता. सायंकाळी 4:30 वाजण्याच्या सुमारास हा ग्रुप तानाजी कडा येथील हवा पॉइंट परिसरात फिरत होता. यावेळी गौतमने मित्रांना “लघवीला जाऊन येतो” असे सांगितले. मात्र, बराच वेळ होऊनही तो परतला नाही. मित्रांनी त्याचा शोध घेतला असता, हवा पॉइंटजवळ त्याची चप्पल आढळली, परंतु गौतमचा पत्ता लागला नाही. सध्या सिंहगड परिसरात मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा असल्याने जमिनीचा अंदाज न आल्यामुळे गौतम खोल दरीत कोसळला असावा, असा अंदाज मित्रांनी व्यक्त केला आहे.
शोधमोहीम सुरू
घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक गिर्यारोहकांनी तातडीने शोधकार्य सुरू केले. बुधवारी रात्री उशिरापर्यंत सुमारे 1000 फूट खोल दरीत शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, मुसळधार पाऊस, जोरदार वारा आणि रात्रीच्या अंधारामुळे शोधकार्याला मर्यादा आल्या. रात्री 11 वाजता शोधमोहीम थांबवण्यात आली. आज, गुरुवारी (21 ऑगस्ट) सकाळी 6 वाजता पुन्हा शोधकार्याला सुरुवात झाली असून, पथक गौतमचा शोध घेत आहे.


