मुंबई : गणेशोत्सवाच्या उत्साहाला चार चाँद लावणारी मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांसाठी आनंदाची खबर दिली आहे. गणेशोत्सवाच्या सणासुदीच्या काळात आर्थिक तंगी येऊ नये यासाठी ऑगस्ट महिन्याचा पगार तब्बल 5 दिवस आधीच, म्हणजेच 26 ऑगस्ट रोजी, बँक खात्यात जमा होणार आहे.
यामुळे सरकारी नोकरदारांचा उत्सवाचा आनंद दुप्पट होणार आहे. याशिवाय, कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफी आणि गणेश मंडळांना रात्री 12 वाजेपर्यंत देखावे सादर करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
गणेशोत्सवाच्या खर्चाची तयारी करताना सरकारी कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 1 सप्टेंबर रोजी देय असणारा पगार 26 ऑगस्ट रोजीच दिला जाणार आहे. हा निर्णय राज्यातील सरकारी अधिकारी, कर्मचारी, जिल्हा परिषद, मान्यता प्राप्त आणि अनुदानित शैक्षणिक संस्था, अकृषी आणि कृषी विद्यापीठे तसेच त्यांच्या संलग्न अशासकीय महाविद्यालयांतील कर्मचारी आणि निवृत्ती वेतनधारकांना लागू आहे. यामुळे मंडप सजावट, गोडधोड पदार्थ आणि उत्सवाच्या खरेदीसाठी कर्मचाऱ्यांचा हात ढिला होणार आहे.
गणेश मंडळांना रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी
गणेशोत्सवाच्या शेवटच्या पाच दिवसांत गणेश मंडळांना रात्री 12 वाजेपर्यंत देखावे आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याची विशेष मुभा मिळणार आहे. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी कराड येथे ही माहिती देताना सांगितले की, याबाबतचा शासन आदेश लवकरच मुख्यमंत्री जाहीर करतील. या निर्णयामुळे गणेशभक्तांना रात्री उशिरापर्यंत बाप्पांच्या दर्शनाचा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेता येणार आहे.
कोकणात जाणाऱ्या भाविकांना टोलमाफीचा दिलासा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या भाविकांना मोठा दिलासा दिला आहे. 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर 2025 या कालावधीत मुंबई-बेंगळुरू आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) अखत्यारीतील टोल नाक्यांवर टोलमाफी जाहीर करण्यात आली आहे. या सवलतीचा लाभ खासगी वाहने आणि एसटी बसेसना मिळणार आहे. यासाठी “गणेशोत्सव 2025 – कोकण दर्शन” नावाचे विशेष टोलमाफी पास देण्यात येणार असून, त्यावर वाहन क्रमांक आणि मालकाची माहिती नोंदवली जाईल.
उत्सवाचा आनंद द्विगुणीत
या तिन्ही निर्णयांमुळे गणेशोत्सव 2025 चा उत्साह आणि आनंद आणखी वाढणार आहे. आधीच पगारामुळे कर्मचाऱ्यांना सणाची तयारी करणे सोपे होईल, तर टोलमाफीमुळे कोकणात जाणाऱ्या भाविकांचा प्रवास खर्चिक आणि सुखकर होईल. गणेश मंडळांना मिळालेल्या अतिरिक्त वेळेमुळे भक्तांना बाप्पांचे दर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा मनमुराद आनंद घेता येईल. गणेशोत्सवाचा हा सोहळा यंदा अधिकच दिमाखदार होणार आहे.


