पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमधील शीतयुद्धाने आता हाणामारीचे रूप घेतले असून, शरद पवार गटाचे वडगाव शेरीचे आमदार बापू पठारे यांच्यासह त्यांच्या कुटुंबावर गुन्हा दाखल झाला आहे. अजित पवार गटाचे पदाधिकारी बंडू खांदवे यांच्या तक्रारीवरून विमानतळ पोलिस ठाण्यात ही कारवाई झाली.
गेल्या शनिवारी लोहगाव येथील एका कार्यक्रमात झालेल्या वादानंतर आता पठारे कुटुंबीय आणि खांदवे यांच्या समर्थकांमध्ये वाद निर्माण झाला आहे. या घटनेने पुण्याच्या राजकारणात नव्याने खळबळ माजली असून, रोहित पवार यांनीही या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे.
वादाचं रूपांतर हाणामारीत बदलले
गेल्या शनिवारी (४ ऑक्टोबर) रात्री साडेनऊ वाजता लोहगाव येथील गाथा लॉन्समध्ये निवृत्त लष्करी अधिकाऱ्याच्या सत्कार कार्यक्रमात आमदार बापू पठारे उपस्थित होते. स्थानिक मुद्द्यांवर चर्चा करताना पठारे यांनी लोहगावमधील रस्त्यांच्या कामावर स्थगिती देण्याचा मुद्दा उपस्थित केला, कारण पाणी आणि सांडपाणी पाइपलाइनचे काम अपूर्ण आहे.
यावरून अजित पवार गटाचे नेते बंडू खांदवे आणि त्यांचे समर्थक भडकले. शाब्दिक वादाने हाणामारीत रूपांतर झाले. खांदवे यांनी पठारे यांना धक्काबुक्की केली, तर पठारे यांच्या चालक शकील अजमोद्दीन शोख (वय ४६, रा. तुकारामनगर, खाडी) यांना मारहाण करून गळ्यातील सोन्याची साखळ हिसकावून घेतली.
पठारे यांच्या चालक शकील शोख यांच्या तक्रारीवरून विमानतळ पोलिसांनी खांदवे यांच्यासह २० जणांवर मारहाण आणि चोरीचा गुन्हा दाखल केला. मात्र, आता खांदवे यांच्या तक्रारीवरून पठारे यांच्यासह त्यांचे दोन मुले आणि पुतण्या महेंद्र पठारे (माजी नगरसेवक) यांच्यासह एकूण नऊ जणांवर गुन्हा नोंदवला गेला आहे. खांदवे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की, पठारे यांनी त्यांना जबर मारहाण केली आणि सोन्याची साखळ हिसकावली. या घटनेत पठारे यांना किरकोळ जखम झाल्या, तर त्यांचा पुतण्या महेंद्र पठारे यालाही मारहाण झाली.


