पुणे: प्रभाग क्रमांक १० ला सीसीटीव्ही सुरक्षेचे कवच देण्याचे आश्वासन भाजपच्या चारही उमेदवारांनी बावधन परिसरातील प्रचारादरम्यान दिले. नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत संपूर्ण प्रभागात अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याची ग्वाही उमेदवारांनी दिली.
भाजपकडून किरण दगडे, रूपाली सचिन पवार, अल्पना गणेश वरपे आणि दिलीप वेडे पाटील हे चारही उमेदवार प्रभाग क्रमांक १० मधून निवडणूक लढवत आहेत. बावधान, शास्त्रीनगर, भुसारी कॉलनी, गादिया इस्टेट आणि मोकाटे नगर परिसरातील विविध भागांत प्रचार फेऱ्या, पदयात्रा व नागरिकांशी थेट संवाद साधताना त्यांनी विकासाचा अजेंडा मांडला.
या वेळी बोलताना उमेदवारांनी सांगितले की, प्रभागातील वाढती लोकसंख्या, वाहतूक, तसेच चोरी व असामाजिक घटनांच्या पार्श्वभूमीवर सीसीटीव्ही यंत्रणा अत्यंत गरजेची आहे. मुख्य चौक, अंतर्गत रस्ते, शाळा, बाजारपेठा, सोसायट्यांच्या प्रवेशद्वारांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून पोलिस व महापालिकेच्या नियंत्रण कक्षाशी ते जोडले जातील. यामुळे गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच महिलांची व ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्थापन, कचरा संकलन, रस्ते दुरुस्ती, पाणीपुरवठा आणि ड्रेनेज व्यवस्थेतील सुधारणा हेही त्यांच्या प्राधान्यक्रमात असल्याचे उमेदवारांनी स्पष्ट केले. “सुरक्षित प्रभाग, स्वच्छ प्रभाग आणि विकसित प्रभाग” हे ध्येय ठेवून काम केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
प्रचारादरम्यान नागरिकांनीही विविध समस्या मांडल्या. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत, निवडून आल्यानंतर तातडीने उपाययोजना केल्या जातील, असे आश्वासन उमेदवारांनी दिले. भाजपच्या चारही उमेदवारांच्या या घोषणेमुळे प्रभाग क्रमांक १० मधील निवडणूक प्रचाराला वेग आल्याचे चित्र दिसून येत आहे.


