Pune Crime: दिग्गज व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी (डीएसके) यांच्यावर झालेल्या कायदेशीर कारवाईनंतर बँकांनी जप्त केलेल्या महागड्या कार अत्यंत कमी किमतीत मिळवून देतो, असे खोटे आमिष दाखवून एका एजंटने एका तरुणाला लाखो रुपयांना फसविले आहे. पुण्यातील एका २३ वर्षीय तरुणाने दिलेल्या तक्रारीवरून खडक पोलीस ठाण्यात संशयित आरोपी मोहसीन महंमद मुल्ला (रा. मोमीनपुरा, गुरुवार पेठ) याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या एजंटने अशाच प्रकारे इतरही अनेकांना आपल्या जाळ्यात ओढून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा संशय पोलिसांना आहे.
बालपणीच्या मैत्रीचा गैरफायदा; ५ लाखांना लावला चुना
पोलिसांनी दिलेल्या तपशिलानुसार, पीडित तरुण आणि आरोपी मोहसीन मुल्ला हे एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते. मुल्ला हा वापरलेल्या जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीचा (सेकंड हँड कार डिलर) व्यवसाय करत असल्याने तक्रारदाराचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. नोव्हेंबर २०२४ मध्ये मुल्लाने या विश्वासाचा गैरफायदा घेतला. त्याने तक्रारदाराला एका ‘इनोव्हा क्रिस्टा’ कारचे फोटो दाखवून, ही गाडी डीएसके यांची असल्याचे सांगितले. कर्ज थकल्यामुळे ‘कोटक महिंद्रा बँके’ने ही आलिशान कार जप्त केली असून, बँकेचे राहिलेले कर्ज चुकते करून केवळ ५ लाख रुपयांत ही गाडी नावावर करून देतो, असे स्वप्न त्याने तरुणाला दाखवले. या आमिषाला बळी पडून तरुणाने नोव्हेंबर २०२४ मध्ये ५ लाख रुपये मुल्लाच्या स्वाधीन केले.
गाडीही नाही आणि पैसेही गेले; पोलिसात धाव घेताच धमकी
रक्कम मिळाल्यानंतर आरोपी मुल्लाने गाडी देण्यास टाळाटाळ सुरू केली. महिने उलटूनही गाडी मिळत नसल्याने तरुणाने वारंवार तगादा लावला. संशय बळावल्याने जेव्हा तरुणाने आपले पैसे परत मागितले, तेव्हा आरोपीने मूळ रूप दाखवत पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला. हतबल झालेल्या तरुणाने पोलिसांत जाण्याचा इशारा दिला असता, आरोपीने त्याला थेट जीवे मारण्याची धमकी दिली. अखेर कोणताच मार्ग न उरल्याने पीडित तरुणाने खडक पोलीस ठाणे गाठून न्याय मागितला.
‘डीएसके’ प्रकरणाच्या पार्श्वभूमीचा घेतला गैरफायदा
गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी बिल्डर डी. एस. कुलकर्णी यांच्यावर यापूर्वीच शिवाजीनगर पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. त्या कारवाई दरम्यान आर्थिक गुन्हे शाखेने (EOW) आणि विविध बँकांनी त्यांच्या अनेक आलिशान गाड्या ताब्यात घेतल्या होत्या. याच संवेदनशील प्रकरणाचा आणि जप्त झालेल्या गाड्यांचा गैरफायदा घेत आरोपीने तरुणाला जाळ्यात ओढले. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयसिंग दाढे करत असून, आरोपीने आणखी किती जणांना लुबाडले आहे, याचा शोध पोलीस घेत आहेत.


