पुणे: पुण्यात सायबर चोरीची आणखी एक घटना समोर आली आहे. या घटनेत एका ज्येष्ठ महिलेला लूबाडण्यात आले. सायबर चोरट्यांनी महिलेला व्हिडिओ कॉलवर त्यांच्या खात्यातून पैशांचा गैरव्यवहार झाल्याची भिती दाखवली. तसेच सीबीआय कारवाई टाळायची असल्यास कोटींच्या घरात रोख रक्कम द्यावी लागेल असे सांगितले. महिलेने कारवाईच्या भितीला घाबरून सर्व पैसे त्यांना दिले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 16 ऑगस्ट रोजी तक्रारदार ज्येष्ठ महिलेच्या मोबाईलवर सायबर गुन्हेगारांनी संपर्क साधला. त्यांनी ‘व्हिडिओ कॉल’च्या माध्यमातून संवाद साधत स्वतःला पोलिस अधिकारी म्हणून भासवले होते. त्यांनी पोलिसांचा गणवेश घातला होता आणि महिलेच्या बँक खात्याचा काळ्या पैशांच्या व्यवहारात वापर झाल्याचे सांगून तिला घाबरवले.
काळ्या पैशांच्या व्यवहारात तुमच्या बँक खात्याचा वापर करण्यात आला आहे. तसेच याप्रकरणात सीबीआयकडून कारवाई करण्यात येणार आहे. असे सांगून सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेची 1 कोटी 19 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी 80 वर्षीय ज्येष्ठ महिलेने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चोरट्यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी सीबीआय करत असून, त्यात तिला आणि तिच्या पतीला अटक होऊ शकते. अटक टाळण्यासाठी तातडीने पैसे जमा करावेत, असे सांगून त्यांनी महिलेवर दबाव आणला. त्यांच्या सांगण्यानुसार महिलेने एकूण 1 कोटी 19 लाख रुपये चोरट्यांच्या खात्यात वर्ग केले. त्यानंतर त्यांनी आपले मोबाईल क्रमांक बंद केले. महिलेने चौकशी केली असता आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. त्यानंतर तिने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे करत आहेत.


