BMC Election: मुंबईकरांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आरक्षण सोडतीचे वेळापत्रक जाहीर केले असून, ११ नोव्हेंबर रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीवर २० नोव्हेंबरपर्यंत हरकती नोंदवता येतील, आणि सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २८ नोव्हेंबर रोजी अंतिम आरक्षण यादी राजपत्रात प्रसिद्ध होईल, अशी माहिती आयोगाने दिली आहे.
आरक्षण सोडतीचं वेळापत्रक
- ३० ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर: आरक्षित जागांची संख्या निश्चित करून आयोगाकडे प्रस्ताव सादर
- ६ नोव्हेंबर: सोडतीची अधिकृत अधिसूचना वृत्तपत्रात प्रसिद्ध
- ११ नोव्हेंबर: आरक्षण सोडत काढली जाईल
- १४ नोव्हेंबर: प्रारूप आरक्षण व हरकतींसाठी सूचना प्रसिद्ध
- २० नोव्हेंबर: हरकती आणि सूचना सादर करण्याची शेवटची तारीख
- २१ ते २७ नोव्हेंबर: हरकतींचा विचार आणि निर्णय प्रक्रिया
- २८ नोव्हेंबर: अंतिम आरक्षण राजपत्रात प्रकाशित
प्रभाग रचनेला मंजुरीनंतर पुढचं मोठं पाऊल
मुंबई महापालिकेच्या २२७ प्रभागांची रचना राज्य निवडणूक आयोगाने आधीच मंजूर केली आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष आरक्षण सोडतीकडे लागले आहे. राजकीय पक्षांचे नेते, माजी नगरसेवक आणि संभाव्य उमेदवार कोणत्या प्रभागात आरक्षण लागू होणार याची आतुरतेने वाट पाहत आहेत.
राजकीय समीकरणांमध्ये बदलाची शक्यता
२२७ प्रभागांपैकी १७ प्रभाग हे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. तर उर्वरित २१० प्रभागांमध्ये ओबीसी आरक्षण निश्चित केले जाणार आहे. यामुळे मुंबईतील राजकीय संतुलन आणि निवडणूक गणितात मोठा बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मुंबई महापालिकेचा कार्यकाळ ७ मार्च २०२२ रोजी संपला, आणि त्यानंतरपासून पालिकेवर प्रशासकाची सत्ता आहे. निवडणुका कधी होणार याबाबत चर्चा सुरू असतानाच आरक्षण सोडतीच्या या घोषणेमुळे मुंबईतील राजकीय वातावरण पुन्हा तापणार आहे.


