काळेवाडी: पिंपरी चिंचवडच्या काळेवाडी-रहाटणी येथील स्पर्श हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी एका ३५ वर्षीय महिलेच्या पोटातून तब्बल १३ किलो १५० ग्रॅम वजनाची गाठ यशस्वीपणे काढून तिला जीवनदान दिले आहे. ही एक अत्यंत दुर्मीळ आणि आव्हानात्मक शस्त्रक्रिया होती, डॉ. अशोक लांडगे यांच्या नेतृत्वाखालील टीमने यशस्वी करून दाखवली. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील महिला गेली वर्षभरापासून पोटात असह्य वेदना, सूज, कमी भूक लागणे आणि चालताना धाप लागणे अशा अनेक त्रासांनी त्रस्त होती. गेल्या काही महिन्यांपासून तिच्या पोटाचा आकार लक्षणीयरीत्या वाढत होता. स्थानिक पातळीवर केलेल्या उपचारांनी फरक न पडल्याने, तिला पुण्यातील स्पर्श हॉस्पिटलमध्ये पुढील उपचारांसाठी दाखल करण्यात आले.
चार तासांची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी
सर्व आवश्यक वैद्यकीय तपासण्या आणि निदान झाल्यानंतर, २१ मे रोजी या महिलेवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. तब्बल चार तास चाललेल्या या गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेत, डॉक्टरांनी पोटातील १३ किलो वजनाची प्रचंड गाठ पूर्णपणे काढण्यात यश मिळवले.
या कठीण शस्त्रक्रियेसाठी शल्य चिकित्सक सर्जन डॉ. अशोक लांडगे यांच्यासोबत भूलतज्ज्ञ डॉ. बी. दिलीप मेहता, डॉ. आदित्य बसवनाथे, डॉ. सोमनाथ निकम, डॉ. सोपान क्षीरसागर, डॉ. आशिष तायडे आणि डॉ. ऋषी भाकरे यांचा समावेश असलेल्या तज्ञ डॉक्टरांच्या पथकाने मोलाची कामगिरी बजावली. ऑपरेशन थिएटरमध्ये प्रदीप तावरे, डॉ. स्नेहल लांडगे आणि रोशन सावंत यांनीही महत्त्वाचे सहकार्य केले. रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉ. लांडगे यांच्या अनुभवाची आणि तज्ञ टीमच्या कौशल्याची प्रशंसा केली, ज्यामुळे हे मोठे यश शक्य झाले.
रुग्णाचे नातेवाईक राजेंद्र साळवे आणि कुणाल निकाळजे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “डॉक्टरांनी अतिशय काळजीपूर्वक तपासण्या करून शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. आज आमच्या रुग्णाची प्रकृती सुधारली असून, तिला जणू दुसरा जन्म मिळाल्यासारखे वाटत आहे.”


