पुणे: महाराष्ट्रातील हवामान विविध भागांमध्ये वेगवेगळ्या स्थितीत आहे. राज्याच्या काही भागांत अजूनही तीव्र उष्णतेची लाट कायम असून, तर काही ठिकाणी मान्सूनच्या आगमनाचे संकेत म्हणून हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ६ ते १३ जून दरम्यान राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे, विशेषतः दक्षिण कोकण आणि पश्चिम घाटाच्या परिसरात पावसाचा जोर वाढणार आहे. २० जूननंतर मान्सूनचे वारे अधिक बळकट होतील आणि राज्यात पावसाचा जोर वाढेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
मान्सून सध्या तळ कोकणात दाखल झाला असून कोकणातील अनेक भागात पावसाने हजेरी लावली आहे. लवकरच महाराष्ट्राच्या आणखी भागात मान्सून दाखल होणार असल्याचं हवामान खात्याने सांगितले आहे.
मुंबई, ठाणे, रायगड, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिक, कोल्हापूर, सांगली, सातारा, नांदेड, धाराशिव, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांसाठी पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. दक्षिण कोकणातील काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. गडचिरोली आणि सिंधुदुर्गमध्येही हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
नागपूरमध्ये ४४.२°C तापमानाची नोंद झाली, जे राज्यातील सर्वाधिक तापमान होते. तथापि, हलक्या पावसामुळे नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. चंद्रपूरमध्ये २७.४ मिमी पाऊस पडल्याने तापमान ४०.२°C पर्यंत खाली आले. मात्र, विदर्भाच्या इतर जिल्ह्यांमध्ये अजूनही उष्णतेची तीव्रता कायम आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) १० ते १३ जून दरम्यान विदर्भासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे, ज्यात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि ३०-४० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याच्या वाऱ्याची शक्यता वर्तवली आहे.
मराठवाड्यातही उष्णतेची लाट अनुभवली जात आहे. राज्यातील कृषी विभागाने शेतकऱ्यांना सध्या पिकांची पेरणी टाळण्याचा सल्ला दिला आहे, कारण मान्सून अद्याप पूर्णपणे सक्रिय झालेला नाही.


