पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राजकीय पक्षांनी रणशिंग फुंकले असून, महायुतीतील अंतर्गत स्पर्धा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पुण्यात मोठी राजकीय खेळी खेळली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळीक असणाऱ्या कट्टर हिंदुत्ववादी पतित पावन संघटनेशी युतीची घोषणा करून शिंदे गटाने भाजप आणि अजित पवारांच्या एनसीपीला अप्रत्यक्षपणे शह दिला आहे.
रविवारी (९ नोव्हेंबर) पुण्यात पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात ही युती औपचारिकपणे जाहीर झाली, यात शिंदे यांनी हिंदुत्व आणि मराठी बाण्याच्या मुद्द्यावर भर दिला. ही युती पुण्यातील महापालिका आणि इतर स्थानिक निवडणुकांसाठी शिंदे सेनेला मजबूत आधार देणारी ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
पुण्यातील मेळाव्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना म्हटले, “शिवसेनेने आतापर्यंत अनेक मित्र जोडले आणि युती केल्या, पण पतित पावन संघटनेसोबतची ही युती आगळीवेगळी आहे. दोन्ही संघटना भगव्या रंगाच्या प्रवासात एकत्र आल्या आहेत.
हिंदुत्वासाठी हा आनंदाचा दिवस आहे. ‘गर्व से कहो हम हिंदू हैं’ हा नारा शिवसेनेचाच होता आणि आजही तो जपत राहू.” शिंदे यांनी मराठी बाणा आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर पतित पावन संघटनेची प्रशंसा केली, जी आरएसएसशी जोडलेली असून, पुण्यात हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये प्रभावशाली आहे.
मेळाव्यात उद्योगमंत्री उदय सामंत, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, पर्यटनमंत्री शंभुराज देसाई, खासदार श्रीरंग बारणे, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार विजय शिवतारे यांसह शिंदे सेनेचे अनेक नेते उपस्थित होते. पतित पावन संघटनेचे प्रमुख संभाजी भिडे यांनीही युतीचे स्वागत केले असून, “हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ही एकजूट मजबूत होईल,” असे सांगितले. ही युती केवळ हिंदुत्वावर आधारित असून, राजकीय मुद्द्यांवर नाही, असा स्पष्ट संदेश शिंदे यांनी दिला.


