पुणे: महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १० मधील प्रचार सध्या वेग घेत आहे. बावधन परिसरात सुरू असलेल्या प्रचार फेऱ्यांदरम्यान एक महत्त्वाची बाब समोर आली असून, या प्रभागातील चारही उमेदवारांनी कार्यकर्त्यांच्या जीवावरच निवडणूक जिंकता येते असे एकमुखाने मान्य केले आहे. येथे भाजपकडून किरण दगडे, रूपाली सचिन पवार, अल्पना गणेश वरपे, दिलीप वेडे पाटील हे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत.
प्रभागातील विविध भागांत पदयात्रा, घरोघरी भेटी आणि छोट्या सभांच्या माध्यमातून प्रचार सुरू आहे. या वेळी उमेदवारांसोबत मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होत असून, नागरिकांशी थेट संवाद साधण्याचे महत्त्व अधोरेखित होत आहे. मतदारांपर्यंत पोहोचण्याचे खरे काम कार्यकर्ते करत असल्याने त्यांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरत असल्याचे चित्र दिसत आहे.
यावेळी किरण दगडे यांनी सांगितले की, “कार्यकर्ते हे निवडणुकीतील खरी ताकद आहेत. परिसरातील समस्या, नागरिकांच्या अपेक्षा आणि विकासकामांचा आढावा ते सातत्याने आमच्यापर्यंत पोहोचवतात. त्यांच्या मेहनतीशिवाय विजय शक्य नाही.”
रूपाली सचिन पवार यांनी नमूद केले की, “ “कार्यकर्ते हेच पक्षाचे खरे बळ आहेत. प्रत्येक परिस्थितीत ते मतदारांपर्यंत पोहोचतात. मतदारांशी विश्वासाचे नाते निर्माण करण्याचे काम कार्यकर्ते करत असतात. निवडणूक ही केवळ उमेदवाराची नसून संपूर्ण संघाची लढाई असते. प्रभागातील प्रत्येक समस्या कार्यकर्त्यांमुळेच आम्हाला कळते. तेच आमचे डोळे आणि कान आहेत. असे देखील पवार यांनी म्हटले.
दिलीप वेडे पाटील यांनी स्पष्ट केले की, “मतदारांचा विश्वास संपादन करण्यासाठी कार्यकर्त्यांची विश्वासार्हता फार महत्त्वाची आहे. त्यामुळेच निवडणूक जिंकण्याची ताकद मिळते.”
अल्पना गणेश वरपे यांनी सांगितले की, “प्रभागातील पाणीपुरवठा, रस्त्यांची अवस्था, वाहतूक कोंडी, कचरा व्यवस्थापन अशा अनेक प्रश्नांची माहिती कार्यकर्त्यांमुळेच मिळते. त्यामुळे योग्य नियोजन करता येते.” तर दिलीप वेडे पाटील यांनी मत व्यक्त करताना सांगितले की, “कार्यकर्त्यांची विश्वासार्हता आणि जनसंपर्क हीच निवडणुकीची खरी शिदोरी आहे.”
दरम्यान, प्रचारादरम्यान बावधन परिसरातील नागरिकांनी पायाभूत सुविधा, स्वच्छता, पार्किंगची समस्या, सार्वजनिक वाहतूक आणि सुरक्षिततेसारखे प्रश्न उमेदवारांसमोर मांडले. या सर्व मुद्द्यांवर उपाययोजना करण्याची आश्वासने उमेदवारांकडून देण्यात आली.
प्रभाग क्रमांक १० मध्ये यंदाची निवडणूक चुरशीची होणार असून, कोणाला मतदारांचा कौल मिळतो हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र सध्याच्या प्रचारातून एक गोष्ट ठळकपणे समोर येत आहे. या निवडणुकीत विजयाची गुरुकिल्ली कार्यकर्त्यांच्या मेहनतीतच दडलेली आहे.


