Bigg Boss Marathi 3 fame Jay Dudhane arrested : बिग बॉस मराठी सीझन ३ मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता आणि फिटनेस उद्योजक जय दुधाणे अडचणीत सापडला आहे. ठाणे पोलिसांनी मुंबई विमानतळ परिसरातून जय दुधाणेला अटक केली असून त्याच्यावर तब्बल ५ कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप आहे. या कारवाईमुळे मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बनावट दस्तऐवजांच्या आधारे एकाच दुकानाची अनेक जणांना विक्री करून आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप जय दुधाणेवर आहे. या प्रकरणात केवळ जय दुधाणेच नव्हे, तर त्याचे आजी-आजोबा, आई आणि बहिणींचाही समावेश करण्यात आला आहे. पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
जय दुधाणे हा फिटनेस क्षेत्रातील एक लोकप्रिय चेहरा असून त्याने मनोरंजन विश्वातही आपली ओळख निर्माण केली आहे. एमटीव्ही स्प्लिट्सव्हिला १३ चा विजेता ठरलेला जय बिग बॉस मराठी सीझन ३ मध्ये स्पर्धक होता आणि तो उपविजेता ठरला होता. याशिवाय ‘येडं लागलं प्रेमाचं’ या मालिकेतून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते.
ठाण्यात जय दुधाणे यांचे ‘फिटर्नल’ नावाचे जिम तसेच ‘मिस्टर इडली’ हे रेस्टॉरंट आहे. काही मराठी मालिका आणि म्युझिक व्हिडिओमधूनही तो प्रेक्षकांसमोर आला आहे. विशेष म्हणजे डिसेंबर २०२५ मध्ये त्याने हर्षला पाटील यांच्यासोबत विवाह केला होता.
आता मात्र जय दुधाणेच्या अटकेमुळे त्याच्या करिअरवर मोठं सावट निर्माण झालं असून, या प्रकरणात पुढे काय खुलासे होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


