पुणे : कोथरूड गोळीबार प्रकरणात कुख्यात गुंड निलेश घायवळ (Nilesh Ghaywal) याच्या घरात पुणे पोलिसांनी घेतलेल्या झडतीत रिकामा ॲम्युनेशन बॉक्स सापडला आहे. या बॉक्समध्ये ५.५६ एमएम काडतुसे ठेवण्याची क्षमता असून, त्यावर २०१७ चा उल्लेख आहे. बॉक्स रिकामा असला तरी त्यातील काडतुसे कुठे गेली, याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास तीव्र केला आहे.
निलेश घायवळविरुद्ध आतापर्यंत दहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. सध्या तो स्वित्झर्लंडमध्ये असून, गायवळ नावाचा पासपोर्ट वापरत असल्याचे तपासात उघड झाले आहे. ६ ऑक्टोबर रोजी कोथरूड पोलिसांनी त्याच्या घराच्या तिसऱ्या मजल्यावरील जिन्यातील इन्व्हर्टरच्या मागे लपवलेला हा लोखंडी बॉक्स शोधून काढला. बॉक्समध्ये एक सत्तूर (मोठा सुरा) सापडला, परंतु ३०० काडतुसे ठेवण्याची क्षमता असलेल्या या बॉक्समध्ये एकही काडतूस आढळले नाही.
पोलिसांनी खडकी येथील ॲम्युनेशन फॅक्टरीशी पत्रव्यवहार सुरू केला असून, हा बॉक्स कोठून आला आणि कोणाला देण्यात आला, याचा रेकॉर्ड मागवला आहे. यापूर्वी झडतीत दोन काडतुसे आणि चार पुंगळ्या जप्त करण्यात आल्या होत्या, त्यानंतर कोथरूड पोलिसांनी घायवळविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस घायवळच्या आर्थिक स्रोतांचा छडा लावण्याचा प्रयत्न करत असून, या प्रकरणी त्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.


