सोलापूर : सप्टेंबरमधील अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दिवाळी सणाच्या तोंडावर आर्थिक चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने दिलेला शब्द पाळत सोलापूर जिल्ह्यातील ६ लाख ७८ हजार ५९२ शेतकऱ्यांसाठी ७७२ कोटी ३६ लाख ४५ हजार रुपयांची मदत मंजूर केली आहे.
ही रक्कम आज (१८ ऑक्टोबर) दुपारपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा करण्यास सुरुवात होणार आहे. लक्ष्मीपूजनापूर्वीच खात्यांमध्ये ‘लक्ष्मी’ वर्ग होणार असल्याने शेतकरी कुटुंबांना सण साजरा करण्यासाठी मोठा आधार मिळेल.
सप्टेंबरमध्ये २१ तारखेपासून महापुराचे संकट ओढवले होते. एनडीआरएफच्या नियमाप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत भरपाई दिली जाते, मात्र राज्य सरकारने तीन हेक्टरपर्यंत मदत करण्याचा निर्णय घेतला. आजच्या शासन निर्णयात दोन हेक्टरपर्यंतच्या नुकसानीसाठी ७७२ कोटींची मदत मंजूर झाली असून, उर्वरित एक हेक्टरसाठीचा निर्णय एक-दोन दिवसांत येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली. या मदतीमुळे पाच लाख ३८ हजार ८८९.५४ हेक्टर क्षेत्र बाधित शेतकऱ्यांना लाभ होईल.
राज्यभरात २३ जिल्ह्यांतील ३३ लाख ६५ हजार ५४४ शेतकऱ्यांसाठी ३ हजार २५८ कोटी ५६ लाख ४७ हजार रुपयांची मदत मंजूर झाली आहे. शासकीय सुट्टीच्या दिवशी झालेल्या या निर्णयानंतर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सर्व तालुक्यांतून बाधित शेतकऱ्यांच्या याद्या तत्काळ अपलोड करण्याचे आदेश दिले. दुपारपासून महसूल यंत्रणा याद्या अपलोड करण्याच्या कामाला लागली असून, आज रात्रीपर्यंत आणि उद्या (१९ ऑक्टोबर) दुपारपर्यंत हे काम पूर्ण होईल. त्यानंतर रविवारीपासून खात्यांमध्ये रक्कम जमा होईल.


